Read in
रविवार 13 मार्च 2022 ते शनिवार 19 मार्च 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 13 चंद्ररास मिथुन 13.28 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 20.04 पर्यंत व नंतर पुष्य.
रविवार 13 मार्च 2022 ते शनिवार 19 मार्च 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 13 चंद्ररास मिथुन 13.28 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 20.04 पर्यंत व नंतर पुष्य. सोमवार 14 मार्च चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 22.06 पर्यंत व नंतर आश्लेषा. मंगळवार 15 चंद्ररास कर्क 23.22 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 22.32 पर्यंत व नंतर मघा. बुधवार 16 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 24.20 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. गुरूवार 17 मार्च चंद्ररास सिंह 30.31 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 24.33 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. शुक्र वार 18 चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 24.17. शनिवार 19 चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 23.37 पर्यंत व नंतर चित्रा.
सोमवार आमलकी एकादशी
मंगळवार भौमप्रदोष
गुरूवार हुताशनी पौर्णिम
शुक्रवार धूलिवंदन
मेष :–परगावाहून येणाऱ्या वस्तू, कुरियरने येणाऱ्या वस्तू पार्सल्स वेळेवर येण्याची शक्यता कमी आहे. तरी चौकशी करावी लागेल. अनपेक्षित येणाऱ्या खर्चामुळे भांबावून जाल. विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करता येणार आहेत. बहीण-भावंडातील वाद तुमच्या पुढाकाराने सहजपणे मिटवता येणार आहेत. आर्थिक व्यवहार सांभाळताना घाई करू नका. कायदेशीर बाबींवरील नव्याने सुरू झालेल्या वादावर पडदा टाकता येणार नाही. आईवडिलांच्या प्रकृतीच्या तक्रारीत अचानक वाढ होईल. काळजी घ्यावी लागेल.
वृषभः उद्योगधंद्यात रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील. हा सप्ताह संमिश्र स्वरुपाची फळे देणारा ठरेल. अनावश्यक खर्च होणार असल्याने आर्थिक भार वाढेल. इतरांच्या नादाने मनात नसतानाही खरेदी कराल. नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करावे लागतील. कोर्टाच्या रेंगाळलेल्या कामात लक्ष घातल्यास मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांनी औषधी क्षेत्रातील शेअरमध्ये गुंतवणूक करावी. महिलांना अचानक सामाजिक पातळीवर काम करण्याची संधी मिळेल तर पुरुषांना सामाजिक पातळीवर काम करताना विरोध दिसून येईल.
मिथुनः बऱ्याच दिवसांपासून दबलेल्या इच्छा तुम्हाला सहजपणे मार्गस्थ करता येणार आहे. स्वभावातील आळशीपणा कमी होऊन कामे मार्गी लावाल. विविध छंदांची आवड असणाऱ्यांना समाजापुढे सादरीकरण करता येईल. वयस्कर व आजारी असलेल्यांची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे जाणवेल. बँकांची कर्जे परतफेड करण्याचे नियोजन अचूक ठरेल. एखादा महसूल भरावयाचा राहिला असल्यास या सप्ताहात तुमची दुप्पट रक्कम जाणार आहे. तरी त्वरित जागे व्हावे लागेल. स्त्रियांना आपला डावा डोळा जपावा लागेल. गायक मंडळींनी कोणतेही अपथ्य न करता आपला गळा सांभाळावा.
कर्कः जी कामे तुमची सहजपणे होत होती त्या कामातील कष्टात वाढ होणार आहे. सरकारदरबारी अडकलेली कामे करण्याचा प्रयत्न या सप्ताहात करू नका. मित्र-मैत्रिणींच्या मदतीसाठी तुमच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलाची संधी मिळाल्याचे जाणवेल. त्याचा फायदा कसा घ्यावयाचा याचा विचार आधीच करून घ्यावा. मुलांच्या विवाहासाठी असलेल्या गरजेपोटी प्रॉव्हिडंट फंडातील मदत वेळेवर मिळत असल्याचे कळेल. महिला आपल्या बोलण्यातील कलेमुळे बऱ्याच गोष्टी जिंकून जातील. महिलांनी आपले पैसे ठेवण्याच्या जागेत बदल करावा. वार्ताहर, संपादक यांनी आपले काम तपासून पाहावे.
सिंहः विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षित यश मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपले नियोजन अचूक करण्याची गरज आहे. महिलांना पाय, पोटऱ्या दुखण्याचा त्रास होईल. कुटुंबात एखादा सण सभारंभ साजरा होण्यासाठी लेकी, सुनांची चांगली मदत मिळेल. वडील भावंडाबरोबर तुमचे असलेले जुने वाद संपुष्टात येण्याचे प्रसंग आनंददायक ठरतील. लहान मुलांना बाल्कनी, व्हरांडा यापासून सांभाळा. पती-पत्नीतील झालेले मतभेद, रुसवा कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मदतीने दूर होतील. राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्यांनी आपल्या कामाचा गाजावाजा न करता शांतपणे काम करावे. व्यवसायातील दिवाळखोरीवर या सप्ताहात अपेक्षित उपाय सापडेल. आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींना आंतरिक समाधान मिळेल.
कन्याः नोकरी व्यवसायात तुमच्या ज्ञानामुळे व काम करण्याच्या पद्धतीमुळे सर्वत्र कौतुक होईल व वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. सध्या प्रमोशनच्या बाबतीत मात्र कोणतेही वक्तव्य करू नका. महिलांना सासू बाईंकडून एखादा मौल्यवान दागिना मिळेल. सरकारी क्षेत्रातील अधिकारी मंडळींना आपले कर्तव्य बजावताना अनेक अडचणी येत असल्याचे जाणवेल. महिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. लहान मुलांना कडेवर घेऊन उंच जागेवर जाऊ नका. महत्त्वाचे काम करण्यासाठी जाताना प्रथम पूर्वेकडे तोंड करूनच बाहेर पडा. दक्षिण दिशेचा वापर करू नका. वकील मंडळींना त्यांच्या हातातील एखाद्या केसमधील गुंतागुंत वाढत असल्याचे जाणवेल. पासपोर्ट, व्हिसासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी कोणत्याही मध्यस्थावर विश्वास न ठेवता प्रयत्न करावे.
तूळः बौद्धिक क्षेत्रातील मंडळींना एखाद्या पुस्तक प्रकाशन सभारंभाचे बोलावणे येईल. जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपली गणिते अचूक असल्याचे जाहीर करण्याची हीच वेळ आहे. घराच्या जागेत किंवा राहत्या जागेत बदल करण्यासाठी अचानक संधी मिळेल. वयस्कर मंडळींना हार्टचा त्रास असल्यास जास्त दगदग करू नये. धावपळ करू नये. महिलांना अचानक भावनाविवश होण्याचे प्रसंग येतील. खोकला, दमा असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. प्रेमविवाहाच्या बाबतीत घाई न करता मित्रमैत्रिणींऐवजी कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. कवी, लेखक यांच्या साहित्यावर वाचकांकडून जोरदार टीका होईल. तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यास फजिती होणार नाही.
वृश्चिकः कुटुंबात कुळाचाराच्या धार्मिक पुजेचे नियोजन होऊन त्याची जबाबदारी तुमच्यावर असेल. सतत संकटांची मालिका सहन करणाऱ्यांना अचानक या सप्ताहात बऱ्याच गोष्टी आपल्या बाजूने होत असल्याचे जाणवेल. निर्णय प्रक्रियेत दोलायमान न होता योग्य त्या निर्णयाला ठाम राहा. भागीदारीतील व्यवहारात विचार न करता अडचणींचा बाऊ करू नका. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, अक्षरशास्त्र यातील तज्ज्ञांनी आपले विचार अतिशय स्पष्टपणे मांडणे गरजेचे राहील. स्पर्धात्मक परीक्षेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची घाई करू नये. व्यवसाय क्षेत्रातील मंडळींना पूर्वी दिलेले कर्ज वसूल होणार असल्याचे संकेत मिळतील. प्रौढ महिलांना कंबर, ओटीपोट दुखण्याचा त्रास होईल. पुरुषांना पाठीचा कणा दुखण्यापासून त्रास संभवतो. नवविवाहितांना सासूरवाडीकडून आर्थिक भेट मिळेल. ज्या निवृत्त मंडळींना पेन्शनचा लाभ झालेला नाही, त्यांची कामे या सप्ताहात कामी लागतील.
धनूः हातामध्ये चालू असलेले काम सोडून प्रलोभनामुळे दुसऱ्या कामाच्या मागे जाण्याचा योग आहे. व्यवसायातील महत्त्वाचे नियम हे तुम्ही पाळावयाचे आहेत याची आठवण ठेवावी लागेल. डॉक्टर मंडळींना अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या केसेस हाताळाव्या लागतील. पाणी किंवा पाण्यापासून होणारे रोग यांचा त्रास संभवतो. मित्र, सहकारी यांच्या मदतीने हा सप्ताह तुम्ही व्यसनाच्या आधीन जाणार असल्याची सूचना देत आहे. शिक्षक, प्राध्यापक मंडळींना आपले काम चोख केल्यामुळे समाधान लागेल. कुटुंबातील प्रथम संततीकडून आनंदाच्या व समाधानाच्या बातम्या मिळतील. पाळीव प्राण्यापासून लहानमुलांना सांभाळा.
मकरः सेवावृत्तीने काम करणाऱ्यांना या सप्ताहात मानसन्मान मिळेल. आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींना त्यांच्या पूर्व पुण्याईमुळे एखाद्या गुरुपदी मान्यता मिळेल. न्यायालयात लटकलेले प्रश्न सोडवण्यासाठी या सप्ताहात घाई करू नका व ओळखही लावू नका. पती-पत्नीतील दुरावा ज्येष्ठांच्या हस्तक्षेपाने कमी होऊन पुनर्मिलन होण्याचे संकेत मिळत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना अतिशय मानाचे स्थान मिळेल. गूढविद्या व अंकशास्त्र यांच्या अभ्यासकांनी आपला अभ्यास वाढवण्याची गरज आहे हे जाणवेल. पोस्ट, टेलिफोन येथील कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाची दिशा बदलू नये. वयस्कर मंडळींच्या कानाला दुखापत होण्याची शक्यता आहे.
कुंभः प्रेमविवाहाच्या संदर्भात झालेले गैरसमज दूर करण्यासाठी इतरांची मदत घ्यावी व स्वतःचा हट्ट सोडावा. अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील मंडळींना आपले प्रयत्न सकारात्मक मार्गाने जात असल्याचे जाणवेल. कृत्रिम गर्भधारणेच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचा विचार करावा लागेल. मंत्रविद्या व ज्योतिष विद्या यातील पारंगत मंडळींना आपले ज्ञान दाखवण्याची संधी मिळेल. कलाकार व गायक मंडळींना सामाजिक स्तरावरून कौतुक होईल. नेमबाजी शिकणाऱ्या मुलांनी योग्य शिक्षकांची निवड करावी. प्रवास करताना आपल्या मौल्यवान गोष्टी व महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक न ठेवल्यास गहाळ होण्याची शक्यता आहे. दळणवळण व रेल्वेखात्यात काम करणाऱ्यांना दैवी शक्तीचा अनुभव येईल. शिक्षणातील यशाकरिता केलेली मेहनत सार्थकी ठरल्याचे विद्यार्थ्यांना जाणवेल.
मीनः तुम्ही लांब राहात असाल तर आईच्या प्रकृतीची चौकशी करणे महत्त्वाचे ठरेल. दवाखान्यात दाखल असलेल्या आईच्या प्रकृतीबाबत सेंकड ओपिनीयन घ्यावा. जन्मगावी घर बांधण्याच्या विचारात पुनर्विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामुळे बक्षिस मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी करावा लागणारा प्रवास त्रासदायक ठरेल. वयस्कर मंडळींच्या बाबत प्रकृतीची बारकाईने चौकशी करावी. सिनेमा, वाड्.मय, नाटक क्षेत्रातील कलाकारांना कामाच्या नव्या संधी मिळतील. पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रातील मंडळींना त्यांचे विचार लोकांनी उचलून धरल्याचे जाणवेल. वडील भावंडांकडून लहान भावंडाला आवश्यक ती आर्थिक मदत मिळेल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पासपोर्ट, व्हिसाबाबत अडचणी निर्माण होतील. शाळा, कॉलेजमधील नवीन प्रवेशासाठी कोणतीही ओळख कामी येणार नाही तरी विसंबून राहू नका. हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी प्रकृतीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. महिलांना सासूरवाडीकडून आर्थिक मदत मिळेल.
IIशुभं भवतुII