कृष्णमूर्ती पद्धत

आपल्या सर्वांच्या मनांमध्ये ज्योतिषशास्त्राविषयी एक उत्सुकता असते. भविष्याचे आकर्षण मानवाला अगदी अनादी काळापासून आहे. आपल्या पुढील आयुष्यात काय आहे याची उत्सुकता मानवाला हजारो वर्षापासून आजपर्यंत सुरूच आहे. काळ बदलला, कारणे बदलली, परिस्थिती बदलली पण मनुष्याची मनोधारणा, विचारांची पद्धती व जगण्याची आसक्ती अजूनही जशीच्या तशीच आहे व हजारो लाखो वर्ष तशीच राहणार आहे.

ज्योतिषशास्त्र हा वेदांगाचा भाग असल्याने ग्रह, नक्षत्रे त्यांची स्थिती, गती, पृथ्वीचे परिभ्रमण यामुळेच हे ऋतू किती बरोबर त्या त्या वेळी सुरू होतात हे आपल्याला माहीत आहे. वार्याचा वेग, समुद्रातील लाटांची उंची, पावसाचे अंदाज, थंडीची लाट, उन्हाचा कडाका इत्यादीचे आपल्याला ज्ञान होते.

त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आयुष्यातील चढ उतार, आजारपण, संकदे, दु:खद प्रसंग तसेच यश अपयश, जिंकणे हरणे, जन्म- मृत्यू यांची माहिती जाणून घेण्याचा ओढ असते.

अनादी काळापासून चालत आलेल्या पारंपरिक फलज्योतिषात काही प्रमाणात जर-तरची उत्तरे येतात. अभिप्रेत असलेल्या घटनेचे उत्तर मिळते पण ती घटना कधी होणार आहे याचा कालावधी काढता येत नाही. म्हणूनच या शास्त्रात संशोधनाची गरज निर्माण झाली. व हेच संशोधनाचे काम मद्रासचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य कै. के एस, कृष्णमूर्ती यांनी हाती घेतले. कृष्णमूर्ती पद्धती ही पूर्णतः गणितावर आधारलेली पद्धती आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार करून आपल्याकडे येणार्या कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर देणारी ही पद्धती आहे. कै. कृष्णमूर्ती यांनी नियम तयार केले व या नियमांच्या आधारावर अभ्यासक कोणीही कुठेही असो या पद्धतीमुळे उत्तरात एकवाक्यता आली.

ग्रहांच्या अंशावरून उप नक्षत्रस्वामी उप-उप नक्षत्रस्वामी काढता येऊ लागला. स्पष्ट चंद्रावरून महादशा– अंतर्दशा– विदशा– सूक्ष्मदशा– प्राणदशा इ.च्या अभ्यासाने कालनिर्णय अचूक येऊ लागला. आणि म्हणूनच या रूलींग प्लँनेट्सना स्वामीला यक्षिणीची कांडी म्हटले आहे.

आपण पारंपरिक पद्धतीचे एक उदाहरण बघुया.

एखाद्या व्यक्तिला व्ववसाय किंवा नोकरी काय करावे यासाठी फक्त आणि फक्त दशमस्थानाचा विचार केला जातो. दशमात गुरू उच्चेचा, महादशा ही गुरूची मग कशाला चिंता करायची. धंद्यातही लाभ होईल व नोकरीही प्रमोशन मिळेल तसेच इतर ग्रहांबरोबर जर शुभसंबंध येत असतील तर काही बघायलाच नको. प्रसिद्धीही चालून येईल.

आता हेच उदाहरण कृष्णमूर्ती पद्धती काय सांगते बघुया.

गुरू दशमात इच्छेचा असूनही वरील फळे देणार नाही.

गुरू कोणाच्या नक्षत्रात आहे, कोणाच्या उपनक्षत्रात आहे. त्या नक्षत्राचा स्वामी अजून कोणत्या भावांचा स्वामी आहे. गुरूची नक्षत्रे कोणती आहेत. त्या नक्षत्रात अजून कोणते भाव आहेत. यावर उत्तर अवलंबून राहील.

महादशा, अंतर्दशा, विदशा, सूक्ष्मदशा व प्राणदशा कोणाची आहे यावर का कालावधी अवलंबून राहील. गुरू पुष्य नक्षत्रात असेल लग्न तूळ असेल तर पुष्य राशीच्या स्वामी शनीची राशी चतुर्थ व पंचम स्थानात येईल. तसेच गुरू कोणत्या स्थानाचा स्वामी आहे. या बाबींचा अभ्यास करूया.

गुरू काय काय फळे देईल ः— नक्षत्रस्वामी शनीची राशी ४ व ५ व्या भावात म्हणून प्रमोशन तर नाहीच उलट चतुर्थ स्थान शनिच्या प्रभावाने नोकरीत अडचणी निर्माण होऊन प्रश्नकर्त्याला घरी बसावे लागेल. याउलट गुरू जर पुनर्वसु नक्षत्रात असेल तर प्रश्नकर्त्याला अतिशय उत्तम फळे मिळतील तसेच तो तृतीयेशही असल्याने लहानमोठे प्रवासही होतील व अगदी कमी कालावधीसाठी एखादे वेगळेच प्रोजेक्ट मिळेल.

अशा प्रकारचे नियम देणारी ही कृष्णमूर्ती पद्धती आज श्रेष्ठ ठरतेय. मी वयाच्या १४ व्या वर्षापासून कुंडली पाहतेय. माझे वडील कै. वासुदेव डोंगरकर माझे पहिले गुरू. त्यांनी मला माझ्या वयाच्या ७ व्या ८ व्या वर्षीच दीक्षा दिली. माझ्या वडिलांचे मावसभाऊ गोविंदराव शिराळकर हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे राजपुरोहित आणि ज्योतिषी होते. ते संन्यासी होते पण त्यांना दैनंदिन पुजेकरता राजवाड्यात जाण्यासाठी अंबारी असायची. त्यांच्याकडून माझ्या वडिलांनी ज्योतिषशास्त्राचे शिक्षण घेतले होते. ती ज्ञानपरंपरा पुढे नेण्याचा योग माझ्या आयुष्यात आला आणि माझे शिक्षण सुरू झाले. त्यानंतर अनेक गुरूजनांची कृपा झाली. त्यातले माझे मामा निवृत्त मेडिकल रजिस्ट्रार श्री. शशिकांत गद्रे व कुर्ल्याचे कै. उदय बापट या सर्वांच्या आशीर्वादाने हे काम हाती घेतले आहे.

शैक्षणिक क्षेत्रात ३० वर्षे काम केले. लहान मुलांना घडवण्यापासून ते शिक्षकी पेशाकडे जाणार्या असंख्य विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी मिळाली. सोबत अनेक सामाजिक कार्यात भाग घेता आला. ज्या समाजाकडून घेतले त्याची परतफेड करणे शक्य नसते पण तसे प्रयत्न करणे आपल्या हाती असते हा विश्वास मनात कायम ठेवून ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून समाजसेवा सुरू आहे.