Read in
रविवार 13 फेब्रुवारी 2022 ते शनिवार 19 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.
रविवार 13 फेब्रुवारी मिथुन 29.18 पर्यंत व नंतर कर्क. चंद्र नक्षत्र आर्द्रा 09:26 पर्यंत नंतर पुनर्वसु .
रविवार 13 फेब्रुवारी 2022 ते शनिवार 19 फेब्रुवारी 2022 पर्यंतचे साप्ताहिक राशिभविष्य.
कृष्णमुर्ती पद्धतीने नक्षत्र फलादेश देत आहे.
रविवार 13 फेब्रुवारी मिथुन 29.18 पर्यंत व नंतर कर्क. चंद्र नक्षत्र आर्द्रा 09:26 पर्यंत नंतर पुनर्वसु . सोमवार 14 चंद्र रास कर्क दिवस-रात्र व चंद्र नक्षत्र पुनर्वसु 11.52 पर्यंत व नंतर पुष्य मंगळवार 15 चंद्र रास कर्क दिवस-रात्र व चंद्र नक्षत्र पुष्य 13. 48 पर्यंत व नंतर आश्लेषा. बुधवार 16, चंद्र रास कर्क 15. 13 पर्यंत व नंतर सिंह. चंद्र नक्षत्र आश्लेषा 15. 13 पर्यंत व नंतर मघा. गुरुवार चंद्र रास सिंह दिवस-रात्र व चंद्र नक्षत्र मघा 16. 10 पर्यंत व नंतर पूर्वाफाल्गुनी. शुक्रवार 18, चंद्र रास सिंह 22. 45 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वाफाल्गुनी 16. 41 पर्यंत व नंतर उत्तराफाल्गुनी. शनिवार 19 चंद्र रास कन्या दिवस-रात्र व चंद्र नक्षत्र उत्तराफाल्गुनी 16.50 पर्यंत नंतर हस्त.
वरीलप्रमाणे रोजच्या राशी नक्षत्रांचा विचार करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 13 भीष्म द्वादशी.
सोमवार सोमप्रदोष.
बुधवार माघ शुक्ल पोर्णिमा असून आज माघ स्नान समाप्तीचा दिवस आहे.
गुरुवार गुरुप्रतिपदा गाणगापूर ची यात्रा.
शनिवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे) आहे.
मेष :– या सप्ताहाच्या सुरूवातीलाच तुम्ही करत असलेल्या अपेक्षेप्रमाणे एखाद्या नोकरीच्या मुलाखतीचा कॉल येईल. ज्यांनी एखादी सरकारी निविदा भरली आहे त्याबाबत त्यांना जागरूक राहावे लागेल. व्यवसाय सुरू करण्या करता लागणारा ना हरकत दाखला सहजासहजी मिळणार नाही. विद्यार्थ्यांना दैनंदिन हजेरी असलेले शिक्षण किंवा एखाद्या विशिष्ट कॉलेजमधील प्रवेशाबाबत अडचण निर्माण होईल. राहत्या घरात भरपूर सुखसोयी आणि साधने असूनही बऱ्याच कामात अडचणी निर्माण होतील. प्रवासासाठी जाताना वाहन भाड्याने घ्यावे लागेल. स्वत:च्या वाहनाने प्रवास करू नका.
वृषभ :– अपत्यप्राप्तीच्या प्रतीक्षेत असलेल्याना या सप्ताहात आनंदाची बातमी मिळणार आहे. कुटुंबात एखादा धार्मिक विधी संपन्न होईल. एकमेकाशी असलेले संबंध अतिशय दृढ होऊ लागल्याचे सर्वांनाच जाणवेल. धन खर्च करण्याची पद्धत किंवा रोकड रक्कम खर्च अचानक वाढेल. महिलांना आपली मानसिक शक्ती वाढत असल्याचा अनुभव येईल. तरुण मुलांना एखादे धाडस किंवा साहस करावे असे वाटून त्याची चर्चा मित्रमंडळींबरोबर केली जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेटवस्तू दिली जाईल.
मिथुन :– तरुण मंडळींना अचानक स्वतःच्या मनात डोकावून पहावे अशी इच्छा निर्माण होईल. स्वतःचा स्वभाव व त्यातील गुणदोष यावर तुम्ही स्वतःहून विचार करणार आहात. वास्तविक तुमचे शौर्य आणि दुसऱ्यावर पडणारी छाप ही उत्तम असूनही विनाकारण मनात अनेक शंका निर्माण होतील. शेअर्स सारख्या क्षेत्रात अडकवलेल्या पैशातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या पोषाखा वरून नोकरीच्या ठिकाणी चेष्टा केली जाणार आहे. ज्यांच्या प्रथम विवाहाचा विषय आहे त्यांनी आपल्या अटी, अपेक्षा कमी केल्यास या सप्ताहात समाधान कारक स्थळ जुळून येईल. गायन शिकणाऱ्यांना समाजातून कौतुकाचे, शाबासकीचे अनुभव येतील.
कर्क :– लेखन कला अवगत असलेल्यांना आपले लिखित मजकूर किंवा साहित्य याबाबत जाहीर चर्चा करण्याची संधी मिळेल. पुस्तक लिहायला घेतलेल्या लेखकांना अतिशय सुंदर व समाधान देणारा अनुभव येईल. वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे वयस्कर मंडळीना कफाचा व सर्दीचा त्रास संभवतो. वृत्तनिवेदक, बातमीदार व संपादक यांना कामाचे प्रेशर वाढल्याचे जाणवेल. सिग्नल यंत्रणा व संदेश यंत्रणा क्षेत्रात काम करणाऱ्यांना चमत्कारिक अनुभव येईल. वयस्कर मंडळीना खांद्यापासून हाताच्या बोटांपर्यंत मुंग्या येणे, बधिरपणा वाटणे असा त्रास होईल, तरी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लहान मुलांना झोपाळे, घसरगुंडी यावर बसवताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
सिंह :– शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना तसेच आपल्या प्रभावी वक्तृत्व वर विश्वास असलेल्याना समाजासमोर आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील मंडळींना अचानक गावी जावे लागेल. कुटुंबातील व्यक्ती मधे असलेले लहान-मोठे वाद, मतभेद तुमच्या संवादामुळे कमी होतील व दुरावा कमी होईल. आर्थिक व्यवहार करताना अतिशय काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नोकरी-व्यवसायात मान-सन्मान, प्रसिद्धी व प्रतिष्ठा अपेक्षेप्रमाणे मिळत असल्याचे जाणवेल. ज्या तरुणांना आपली प्रतिकारशक्ती कमी आहे असे वाटते त्यानी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वयस्कर मंडळींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलेल व उत्साह वाढेल.
कन्या :– नोकरी बाबतच्या बऱ्याच प्रश्नांच्या तुमच्या मनात चाललेल्या गोंधळाला ज्येष्ठ मंडळींकडून योग्य ते उत्तर मिळेल व त्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. कलाकार मंडळींना त्यांच्या कलेबद्दल प्रशंसा व गौरव होऊन एखादी मोठी आर्थिक भेट मिळेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना आपल्या कामातून खूप मोठे समाधान मिळेल. कुटुंबातील हरवलेल्या किंवा पळून गेलेल्या व्यक्तींची तुम्हाला व्यक्तिशः माहिती मिळेल. दवाखान्यात ॲडमिट असलेल्या व्यक्तींना आपल्याला आजारपणातून बरे वाटत असल्याचे जाणवेल. चोरीला गेलेल्या वस्तूंचा सुगावा लागेल.
तूळ :– तुम्हाला वाटत असलेले राजकीय क्षेत्राचे आकर्षण वाढेल व त्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तीची भेटही होईल. परमेश्वरावर श्रद्धा असलेल्याना काही ईश्वरी संकेत मिळतील. अध्यात्मिक क्षेत्राच्या अभ्यासकांना आपला मनातील इच्छा पूर्ण होणार असल्याचे खात्री मिळेल. अनोळखी, पूर्वी भेटलेल्या व्यक्ती या सप्ताहात तुम्हाला पुन्हा भेटणार आहेत. हवाई वाहतूक कंपनी, रेल्वे यामध्ये नोकरी करणाऱ्यांना अतिशय समाधान देणारा अनुभव येईल. विद्यार्थ्यांना तसेच व्यावसायिकांनी ठरवलेला परदेश प्रवास अचानक रद्द करावा लागेल. तरुण वर्गास आपल्या मनातील इच्छा, तसेच महत्वाच्या कार्याबाबतचे विचार पूर्णत्वास जाणार असल्याची चाहुल लागेल.
वृश्र्चिक :– महिलांना गर्भवती स्त्रियांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होईल, तरी याबाबतीत दुर्लक्ष करू नये. कॉलेजच्याी मुलांना काही अनैतिक वर्तनाबद्दल पोलिसांचा तसेच समाजाकडून वैचारिक दंडुका खावा लागेल. या सप्ताहात बहुतेक तुमच्या काही खास कामात अडथळे येण्याची शक्यता आहे तरी निराश न होता हा सप्ताह विचार करणे, नियोजन करणे तसेच मोठ्या कामाची पूर्वतयारी करणे यासाठी वापरावा. कुटुंबात जोडीदाराकडून होणाऱ्या सहकार्यावर तुम्हाला पुढे जाता येणार आहे. वेदनादायी आजार असलेल्यानी कितीही महत्वाचे काम असले तरी फार दगदग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
धनु :– व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना किंवा मोठी उलाढाल करताना तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नये. भागीदाराच्या सल्ल्याने येणारे यश तात्कालिक राहील तरी तिसऱ्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कामगार संघटना किंवा चळवळ यातील पदाधिकाऱ्यांना विचार करावा लागणार आहे. आपण करत असलेल्या कामाचा परिणाम सध्या मानसिक त्रास देणारा ठरेल. तरुणांना रूढी बाह्य विचार व्यक्त केल्यामुळे सामाजिक पातळीवरून दबाव निर्माण होईल. वैवाहिक जीवनातील वादग्रस्त विषयाबाबत फक्त स्वतः विचार न करता कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्याचा विचार करावा. हा सप्ताह आपण करत असलेल्या कामातील चुकांची शिक्षा देणारा ठरणार असल्याने विचार करावा.
मकर :– वैवाहिक जीवनात सुरू असलेले वाद, एकमेकातील मतभेद त्यामुळे एकमेकांमधील दुरावा वाढत असल्याचे जाणवेल. प्रथम विवाहाच्या मुलाने आपले विचार पक्के ठरवून मगच होकार द्यावा. ज्यांच्या आयुष्यात सध्या वादळ सुरू आहे, अशा मंडळीनी हा ग्रहांचा परिणाम आहे हे ओळखून शांत राहावे. परिस्थितीमुळे किंवा इतर अडचणीमुळे खंडित झालेले शिक्षण पुन्हा सुरू करता येणार असल्याची चिन्हे दिसू लागतील. ज्यांच्या विवाह संस्था किंवा मंगल कार्यालय आहेत त्याने अति आर्थिक दृष्ट्या अति ताणून धरू नये खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कायदेशीर बंधन पाळावे किंवा व्यवहार पूर्ण होत नसेल तर लेखी ठराव करावा राजकीय क्षेत्रातील मंडळींना विरोधी लोकांकडून कडवा विरोध होणार आहे.
कुंभ :– प्रथम संततीकडून अतिशय आनंदाच्या, समाधान देणाऱ्या, प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील. पती-पत्नीमधील प्रेमाचा भाव हा मतभेदांच्या पेक्षा मोठा ठरेल. तरुण मंडळीनी, मुलानी आपल्या वागण्यात पारदर्शीपणा ठेवावा. व्यवसाय करत असणाऱ्याने कोणत्याही प्रकारची धरसोड वृत्ती ठेवू नये. साथीचे रोग किंवा संसर्गजन्य रोग यापासून वयस्कर मंडळींनी सावध रहावे. तरुणाने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी प्रकर्षाने पाळाव्यात. जमीन, घर यांच्या आर्थिक व्यवहारात फक्त स्वतःच्या विचाराने न जाता इतरांच्या सल्ल्याचा विचार करावा. पित्तप्रकृतीच्या मंडळीना पित्ताचा त्रास होईल.
मीन :– चित्रकार फोटोग्राफर्स यांच्याकडून सरकारी खात्यातील एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी मदत मागितली जाईल. लेखक, साहित्यिक यांच्या विचारांना सामाजिक पातळीवर उचलून धरले जाईल. कुरियर्स कंपन्यांकडून तुमची एखादी महत्त्वाची वस्तू गहाळ होण्याचा धोका आहे. स्थावर मालमत्ता, जमीनजुमला यांच्या विक्री बाबत चे विचार एक मताने घेतल्यास अडचणी निर्माण होणार नाहीत. आई व मुलगा, मुलगी यामधील संबंध विनाकारण ताणले जातील. कुटुंबातील मंडळींमध्ये वैचारिक वाद निर्माण होऊन काही ठरलेल्या गोष्टी रद्द होतील. विद्यार्थी मंडळींना या वर्षीच्या यशासाठी वेगळे तातडीने मार्गदर्शन घ्यावे लागेल.
|| शुभं-भवतु ||