Read in
26 डिसेंबर 2021 ते शनिवार 01 जानेवारी2022 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
26 डिसेंबर 2021 चंद्ररास सिंह 11:13 पर्यंत व नंतर कन्या.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
26 डिसेंबर 2021 चंद्ररास सिंह 11:13 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 29:24 पर्यंत व नंतर हस्त. सोमवार 27 चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 20:06 पर्यंत व नंतर चित्रा. मंगळवार 28 चंद्ररास 16:43 पर्यंत व नंतर तूळ. बुधवार 29 चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती. गुरूवार 30 चंद्ररास तूळ 19:07 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 24:33 पर्यंत व नंतर अनुराधा. शुक्रवार चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 22:04 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. शनिवार 01 जानेवारी 2022 चंद्ररास वृश्र्चिक 19:17 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 19:17 पर्यंत व नंतर मूळ. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व. रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रविवार 26 डिसेंबर भानुसप्तमी, रवि-हस्त अमृतयोग 29:24 पासून ते 31:12 पर्यंत.
सोमवार 27 कालाष्टमी.
गुरूवार 30 सफला एकादशी.
शुक्रवार 31 ला प्रदोष आहे.
शनिवार 01 शिवरात्री, ख्रिस्ताब्द 2022 प्रारंभ.
मेष :– संपूर्ण सप्ताह तुम्हाला पैसे गुंतवण्यासाठी एकदम लाभदायक आहे. स्वत:चा व्यवसाय असेल व भांडवल वाढवण्याची गरज असेल तर नक्की विचार करा. नोकरीतील कामाचा आवाका तुम्हाला आता आटोक्यात येत असलेला जाणवेल. व्यवसायात मात्र इतरांकडून चांगले सहकार्य मिळेल. पुरूष मंडळीना सासुरवाडीकडून भरभक्कम सहकार्य मिळेल. सरकारी कामात आर्थिक व्यवहार करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तुमच्या मताला महत्व मिळेल.
वृषभ :– घराच्या सजावटीसाठी मोठा खर्च कराल. कुटुंबात आईबरोबर प्रेमळ संवाद झाल्याने कुटुंबातील अनेक प्रश्न सुटतील. अचानक आईकडील नातेवाईकांचे येणे झाल्याने कुटुंबात आनंद निर्माण होईल. नोकरीत तुम्हाला न पटणार्या कोणत्याही गोष्टी फार न ताणता त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. बँकेच्या कर्जाच्या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे इतरांवर विसंबून करू नका. नव्याने झालेल्या ओ ळखीबरोबर अंधविश्वासाने व्यवहार करू नका.
मिथुन :–नवीन वर्षात ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याबाबतचे नियोजन करण्याची हीच संधी आहे हे लक्षांत घ्या. महिलांनी अतीविश्र्वासाने केलेली मदत कांही कारणाने वाया गेल्याचे लक्षात येईल. मागचे पाढे पंचावन धरूनच कामाला सुरूवात करा. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना बिलाच्या रकमेची जोडणी करावी लागेल. लहान मुलांच्या मना त या सप्ताहात कांही प्रमाणात चिडकेपणा वाढेल. कोणतीही कामे करण्यापूर्वी त्याचे नियोजन किती महत्वाचे आहे हे तरूणांच्या कळून येईल.
कर्क :राजकीय मंडळीना विरोधकांच्या आरोपाबाबतचा प्रकर्षाने विचार करावा लागेल. काही बाबींचा या सप्ताहात जनतेकडून प्रक्षोभ होण्याचा धोका आहे. नोकरदार मंडळीना प्रतिष्ठेच्या कामाचे आव्हान पेलावे लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील कामात इतरांच्या लुडबुडीने अडचणी निर्माण होणार आहेत. भूतकाळातील अनुभवांची पुनरावृत्ती होणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासातील अडचणी दूर होत असल्याचे जाणवेल.
सिंह :–विद्यार्थ्यांना अनपेक्षितपणे प्रसिद्धीची संधी चालून येईल. कुटुंबातील मुलींच्या बाबतीत विवाहाच्या प्रश्नाबाबत कांही ठोस निर्णय घेतले जातील. देवधर्माच्या कामाबाबत कुटुंबात एकमत होऊन पूजेचा दिवस ठरेल. पैसे गुतवणूकीबाबत तज्ञांच्या सल्ल्याने पूर्वीचे घेतलेले निर्णय लाभदायक ठरल्याचे दिसेल. परगावी असलेल्या, विवाहीत मुलीना घरी येण्याची, माहेरी येण्याची ओढ लागेल. साहित्यिक व कलाकार मंडळींचा जाहीर सन्मान होणार असल्याचे संकेत मिळतील.
कन्या :–नोकरीसाठी पूर्वी दिलेली मुलाखत यशस्वी झाल्याचा निरोप येईल. तरूणांनी आपल्या हातातील कामावर लक्ष केंद्रीत करावे व आपल्या आवाक्याबाहेरची कामे टाळावी. हातातील प्रोजेक्टमधील तुमचा सहभाग महत्वाचा असल्याने तुम्हाला जराही हलगर्जीपणा करून चालणार नाही. व्यवसायातील भागीदारीतील मतभेद वाढणार नाहीत याची दखल घ्या. कुटुंबातील सुना व जावयांकडून त्यांच्या प्रगतीच्या व बातम्या मिळतील. संततीसाठी प्रयत्न करत असलेल्याना योग्य उपायाची संधी मिळेल.
तूळ :–या सप्ताहात तुमच्या हातात असलेल्या कामासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. व्यवसायातील अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला फक्त मागिल अनुभव उपयोगी पडणार आहेत. पतीपत्नीमधील वादविवादामुळे विनाकारण मनस्ताप होणार आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळीना आपले वाक् कौशल्य दाखवता येणार आहे. नवीन जागेच्या व्यवहारात पारदर्शकता असल्याची खात्री करून घ्या.
वृश्र्चिक :–प्रतिष्ठेच्या कामाच्या बाबतीत जागरूक रहा व्यवसायातील नवीन घडी बसवताना अनेक बाबींचा प्रथम उलगडा करून घ्यावा लागेल. बँकेच्या बाबतीत माहित नसलेल्या गोष्टी अती धाडसाने करायला जाऊ नका त्यात तज्ञांचा सल्ला घ्या घेतल्यास ते फायद्याचे ठरेल. मुलांच्या करियर बाबत चिंता निर्माण करणार्या गोष्टी घडतील. पूर्वी इतरांबरोबर केलेल्या गुंतवणूकीतून जराही फायदा होत नसल्याचे लक्षांत येईल. तरीपुन: तशाचप्रकारचा व्यवहार करू नका.
धनु :–या सप्ताहात शेअर्समधील गुंतवणूक जराही लाभदायक राहणार नाही. पुत्रचिंतेच्या बाबतीत कोरडी काळजी मानसिक त्रास देईल. पतीपत्नीमधील जुने मतभेद नव्याने उकरून काढल्याने पुन: वादाला तोंड फुटेल. भावनेत घेतलेल्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान संभवते. नोकरीत महत्वाच्या कामासाठी प्रकर्षाने तुमची निवड केली जाईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना तुमच्या कार्यक्षेत्राबाहेरील नवीन नोकरीची संधी कळेल.
मकर :–कुटुंबात मुलांच्या विवाहाबाबतची निर्णय पक्के झाल्याने आईवडीलांना प्रयत्न करणे सोपे जाणार आहे. राजकीय मंडळीना त्यांच्या स्पर्धकांकडून कारवाईचा त्रास होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या विषयावरून वाद निर्माण होतील. भाड्याच्या जागेतील व्यवसायासाठी तुम्हाला अचानक मालकीच्या जागेचा प्रस्ताव तुमच्यासमोर येईल. या सप्ताहात तुमच्यासमोर येणार्या कोणत्याही अडचणींतून मार्ग काढता येणार आहे.
कुंभ :–तुमच्या व्यवसायातील जुन्या गुंतवणूकदारांकडून नवीन गुंतवणूकीसाठीची तुमची मागणी मंजूर केली जाईल. विद्यार्थ्यांना त्याच्या अवघड विषयातील अडचणी पूर्ण करण्याकरीता अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. तुम्हाला या सप्ताहात प्रवासाचे योग आहेत पण स्वत:वाहन चालवणार असाल तर निश्चितच अतिशय सावधपणा बाळगावा लागेल. तुम्ही बरोबर असलात तरी समोरच्याच्या चुकीमुळे अपघात होण्याचा धोका आहे.
मीन :–सरकारी नोकरदारांनी आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील दुसर्याच्या अधिकारातील कामात हस्तक्षेप करू नये. कुटुंबात अचानक मुलांच्या सहकार्याने आईवडीलांना मानसिक आनंद मिळेल. जुन्या मैत्रीच्या सहवासाच्या क्षणांना उजाळा देणार्या घटना घडतील. व्यवसायाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्यांचा गौरव करण्यात येणार असल्याच्या बातम्या येथील. अहंपणाने कोणतेही प्रकरण ताणून धरू नका. कोणत्याही कार्यात दीर्घकालीन योजनांमधे पैसे गुंतवू नका.
||शुभं-भवतु ||