Read in
रविवार 05 डिसेंबर 2021 ते ११ डिसेंबर चे साप्ताहिक राशीभविष्य
रविवार 05 डिसेंबर चंद्ररास वृश्र्चिक 07:46 पर्यंत व नंतर धनु.
रविवार 05 डिसेंबर चंद्ररास वृश्र्चिक 07:46 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 07:46 व नंतर मूळ. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज श्री मार्तंडभैरव षडरात्रोत्सवारंभ. देवदिपावली.
रविवार 05 डिसेंबर चंद्ररास वृश्र्चिक 07:46 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 07:46 पर्यंत व नंतर मूळ. सोमवार 06 डिसेंबर चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 26:18 पर्यंत व नंतर उत्तरा षाढा. मंगळवार 07 डिसेंबर चंद्ररास धनु 07:43 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 24:11 पर्यंत व नंतर श्रवण. बुधवार 08 डिसेंबर चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 22:39 पर्यंत व नंतर धनिष्ठा. गुरूवार 09 डिसेंबर चंद्ररास मकर 10:09 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 21 :50 पर्यंत व नंतर शततारका. शुक्रवार 10 डिसेंबर चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 21:47 पर्यंत व नंतर शनिवार 11 डिसेंबर चंद्ररास कुंभ 16:15 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 22:30 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.
रविवार श्री मार्तंडभैरव षडरात्रोत्सवारंभ व देवदिपावली.
सोमवार मुस्लिम जमादिलावल मासारंभ.
मंगळवार विनायक चतुर्थी, अंगारक योग.
बुधवार नागपूजन, नागदिवे.
गुरूवार चंपाषष्ठी, श्री मार्तंडभैरवोत्थापन, स्कंदषष्ठी.
शनिवार दुर्गाष्टमी.
मेष :–एकाच वेळेला अनेक गोष्टी करण्याच्या स्वभावामुळे मानसिक ताण येईल. पण त्यावरही मात करून दैनंदिन कामकाजाला सुरूवात कराल. व्यवसायाचे आर्थिक नियोजन करताना बर्याच गोष्टींचे भान ठेवावे लागेल. सध्या तुमच्या हातात असलेल्या प्रोजेक्टमधे तुम्हाला अपेक्षित असलेली ऊंची गाठू शकाल. कुटुंबातील धार्मिक विधीबाबत तुमचा आग्रहीपणा वाढेल . पण त्याचे सगळ्यानाच समाधान मिळेल .
वृषभ :–व्यवसायाबाबतचा आर्थिक नियोजनात अतिशय काटेकोर राहील्यास व्यवसायाचे टेन्शन येणार नाही. मधुमेहीनी डाँक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्या सवयी बदलाव्यात. तरूण प्रेमवीरांवर कुटुंबातील वरीष्ठ मंडळींचा दबाब येईल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सत्तेचा मोह आवरता येणार नाही. विद्यार्थ्यांची सकारात्मकता वाढेल व आत्मविश्वासातही वाढ होणार आहे. नोकरदारांना सध्याच्या क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रात प्रवेश करण्याची इच्छा आवरणार नाही.
मिथुन :–व्यवसायातून वेगवेगळ्या पातळ्यावरील अडचणी सोडवाव्या लागतील. नोकरीतील जिगरी दोस्तांची त्या कामात मदत मिळेल. व्यावसायिक पथ्ये पाळावी लागतील. या सप्ताहात व्यवसायातील प्रलंबित येणी वसूल होऊ लागतील. तरूण वर्गाच्या नोकरी मिळवण्याच्या कामातील अडचणी दूर होतील. खाजगी क्षेत्रातील मुलांना आपल्या कर्तृत्वाला उजाळा देता येणार आहे पतीपत्नीच्या एकत्र व्यवसायात चांगला जम बसल्याचे दिसेल.
कर्क :–नोकरदारांनी आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे महत्व समजून घेऊन कामाला प्राधान्य द्यावे. कोणत्याही परिस्थितीत ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नये. वस्तूस्थितीची शहानिषा करून घ्यावी. सर्वच क्षेत्रातील निर्णय या सप्ताहात अतिशय विचाराने व सावधपणे घ्यावे लागणार आहेत. व्यवसायातील परिस्थिती मात्र संमिश्र स्वरूपाची राहणार आहे. सप्ताहाच्या शेवटी मित्रसंगती मुळे अडचणीत येऊन आर्थिक भार सोसावा लागेल.
सिंह :–या सप्ताहात व्यवसायातील जुनी येणी न मागताही वसून होऊ लागतील. आवश्यक तेथे एखादा फोन करा. बेरोजगारांना साध्या का होईना पण नोकरीचा लाभ होईल. सरकारी नोकरीत असाल तर अतिरिक्त जबाबदारी स्विकारावी लागणार आहे. नात्यातील आजारपण व आर्थिक गरजेसाठी तुम्हाला लहानशा का होईना पण प्रवास करावा लागणार आहे. प्रवासात स्वत:च्या वस्तू अतिशय जबाबदारीने सांभाळाव्या लागतील. मैत्रिणीच्या विवाहासाठी सहकुटुंब गेल्यावर आदरातिथ्याला व मानपानाला अती महत्व देऊ नका.
कन्या :–राजकीय व सामाजिक पदाधिकार्यांमधे एखाद्या मतभेदांमुळे वाद निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केल्यामुळेच पुढील नुकसानीचा प्रसंग टाळल्याचे लक्षांत येईल. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कलाकारांना नवीन कामाच्या आँफर्स येथील. सहज लहानशी खरेदी करताना तुमच्याकडून डबल किंमत वसूल केली जाऊन तुम्ही फसवले जाल. तरूणांनी आपल्या मैत्रीचे रूपांतर विवाहात करण्याच्या दृष्टीने जेष्ठांचा सल्ला घ्यावा.
तूळ :–सप्ताहाच्या सुरूवातीलाच कुटुंबातील जबाबदारी कडे जास्त लक्ष द्यावे लागेल. कोर्टाच्या कामावरील जबाबदारीतून मुक्त होण्याची संधी मिळेल पण सर्व वस्तूस्थितीला नीटपणे हाताळून नंतरच निर्णय घ्या. व्यवसायात नव्याने गुंतवणूक करताना प्रथम तज्ञांचा सल्ला घ्या. अती पैशाच्या लोभाने वैयक्तिक पातळीवर केलेली गुंतवणूक फसवणूक करेल, नुकसान करेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्याचे नियोजन ठरेल व त्याची जबाबदारी तुम्हालाच स्विकारावी लागेल.
वृश्र्चिक :–विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात चालढकल करू नये. व इतर गोष्टींपेक्षा अभ्यासाला महत्व द्यावे. कलाकार व साहित्यिकांना आपल्या साहित्याबाबत बोलण्याची संधी मिळेल व एखादे वेबिनार यशस्वी करून दाखवता येईल. तरूणांनी आपल्या वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास व्यवहार बिघडणार नाहीत. सामाजिक समस्येवरील तुमच्या मनातील विचार महत्वाचे ठरतील व इतरांकडून ही पाठींबा मिळेल. राजकारणातील तुमच्या मतावर विरोधक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील तरी सावध रहावे लागेल.
धनु :–फार दिवसापासून स्वत:च्या घराचे स्वप्न पहात असलेल्या तुम्हाला तुमच्या घराचे पझेशन मिळेल. महिलांना आपल्या इच्छेप्रमाणे घराची सजावट करण्याची घाई होईल. लहान मोठ्या केवढ्याही प्रवासासाठी जाताना प्रथम वाहनाची तपासणी करून घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आईकडील नात्यातून आनंदाच्या बातम्या कळतील. अतिउत्साहाच्या भरात तरूण मंडळी आनंद साजरा करतील.या सप्ताहात शेअर मार्केटचा व्यवहार मात्र अजिबात करू नका.
मकर :–तुमच्या नोकरीतील असलेल्या त्रासदायक व तुम्हाला न पटणार्या गोष्टी लवकरच संपणार आहेत. सरकारी नोकरीत तुम्ही केलेल्या अतिरिक्त कामामुळे वरीष्ठांकडून शाबासकी मिळेल. जुन्या घराच्या विक्रीचे किंवा भाड्याने देण्याचे विचार आता पक्के झाल्याने योग्य मार्ग सापडेल. कुटुंबातील व्यक्तिच्या सन्मानासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल. मानसिक चिंता करणार्या व सतत विचारात असलेल्यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. चोरीस गेलेल्या वस्तूंचा अचानक सुगावा लागेल.
कुंभ :– बौद्धिक क्षेत्रातील मान्यवरांना वेगवेगळ्या ठिकाणांहून वैचारिक विषयावर बोलण्याकरीता बोलवले जाईल. शेअर मार्केटमधे अचानक कोणतेही धाडस करू नका. कुटुंबातील बर्याच गोष्टी सुरळीत सुरू झाल्याने भाग्योदय सदृश्य वातावरण राहील. व्यवसायात नवनवीन उलाढाल्या वाढल्याने आर्थिक बाजू भक्कम राहील. आरोग्याच्या दृष्टीने वयस्कर मंडळीनी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. डाव्या डोळ्याची मात्र काळजी घ्यावी लागणार आहे.
मीन :–या सप्ताहाच्या सुरूवातीलाच कांही प्रमाणात शेअर्समधून तुमचे नुकसान होणार आहे तरी शांत रहा. कोणतेच व्यवहार करू नका. नोकरीत आँफिसकडून अचानक तातडीच्या कामासाठी दुसर्या गावी जावे लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पुरवण्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्चाचा भार पण वाढणार आहे. जमीनीचे बरेच दिवसापासून राहिलेले काम या सप्ताहात तुम्हाला पूर्ण करता येणार आहे. व्यवसायातील परिस्थिती चांगली व समाधानकारक राहील.
||शुभं-भवतु ||