गुरूपुष्यामृतयोगाचे महत्व

गुरूपुष्यामृतयोगाचे महत्व

 

गुरूपुष्यामृत हा शब्द म्हणजे गुरू +पुष्य म्हणजेच गुरूवारी येणारे पुष्य  नक्षत्र. एकूण 27 नक्षत्रे आहेत व राशी 12 आहेत. प्रत्येक नक्षत्रांचे चार भाग पडतात ज्याला आपण पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण व चौथा चरण असे म्हणतो.  दोन  नक्षत्रांची  चार – चार चरणे व तिसर्‍या  नक्षत्राचे एक चरण अशी  नऊ  चरणे एका राशीत असतात. 

कर्क राशीत पुष्य नक्षत्रांची चारही चरणे येतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र असून या पुष्य नक्षत्राचा स्वामी  शनि आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा कर्क रास असते त्यावेळी पुष्य नक्षत्र असतेच. व ही कर्क रास व पुष्य नक्षत्र प्रत्येक महिन्याला येते. मग प्रत्येक महिन्याला गुरूपुष्यामृत योग कां येत नाही ?  तर “  गुरूवारी पुष्य नक्षत्र आले असता गुरूपुष्यामृत योग होतो  ” 

पंचांग म्हणजे पाच अंगांचा अभ्यास. तिथी  वार योग, करण, रास व नक्षत्र ह्या महत्वाच्या  घटकांचा अभ्यास होय. यांच्याच  प्रभावाने  प्रत्येक दिवसाचा शुभ – अशुभपणा ठरत असतो. म्हणूनच गुरूवारी पुष्य नक्षत्र आल्यास हा दिवस शुभ ठरतो. 

या नक्षत्रातून रवि 20 जुलै ते 01 आँगस्ट या कालावधीत भ्रमण करत असतो. तर चंद्र प्रत्येक महिन्याला भ्रमण करत असतो. पुष्य नक्षत्राची या कर्क राशीतील व्याप्ती  03अंश 20 कला ते 16 अंश 40 कला एवढी असते. पुष्य नक्षत्राची दृष्टी अंध असली  तरी त्याचे मुख ऊर्ध्व असते. याचे तत्वही अग्नि आहे व त्याची देवता बृहस्पती आहे. आराध्य वृक्ष पिंपळ आहे. दान रक्तवस्त्र आहे. याचे शुमगुण आपल्यापर्यंत पोहोचवणारे रत्न आहे पुष्कराज व मोती. व अंकही  4 व 8  आहे. 

कोणतेही कार्य करताना त्याचे यश मिळण्यासाठी याच योगावर कार्याची सुरूवात केली जाते. गुरू या ग्रहाला ज्ञान व बुद्धिमत्तेचा ग्रह मानले आहे. शिक्षण, उच्चशिक्षण, कोणत्याही प्रकारचे संशोधकीय काम , गुरू करणे, दिक्षा घेणे, मोठमोठ्या व्यापाराची सुरूवात करणे , धार्मिक कार्य करणे व यासाठी हा दिवस अतिशय लाभदायक असतो. घराचे बांधकामाची सुरूवात करणे, देवालय बांधण्याची सुरूवात करणे वृक्षारोपण करणे यासाठी हे नक्षत्र अ.तिशय महत्वाचे व लाभदायक आहे. 

एखादा व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास हे नक्षत्र लाभदायी आहे. विशेषत:  सोने, चांदी रत्ने विविध दागदागिने, व तयार वस्त्रे यासाठी पण लाभदायक आहे. नाक कान टोचणे, एखाद्या जुनाट रोगावर नवीन औषधाची सुरूवात करणे , यासाठी अत्यंत लाभदायक आहे. मुंज करणे, तसेच अग्निहोत्राची सुरूवात करणे व सर्वात महत्वाचे म्हणजे या नक्षत्रावर सोन्याचा संचय करावा. म्हणूनच फार पूर्वीपासून च आपल्याकडे ही प्रथा आहे कीं प्रत्येक गुरूपुष्यामृताचे दिवशी जेवढे जमेल तितके सोने विकत घ्यावे व त्याचा संचय करावा.  म्हणूनच पूर्वीच्या स्त्रीया प्रत्येक गुरूपुष्यामृताचे मुहूर्तावर सोने घेत असत. 

गुरूपुष्यामृत हा योग फक्त विवाहास चांगला लाभदायक नाही. तसेच या नक्षत्राच्या दिवशी जर ज्योतिषाला एखादा  प्रश्र्न विचारला तर मात्र त्याचे काम लवकर होत नाही असा घट्ट अनुभव आहे. 

ज्याच्या कुंडलीत गुरू प्रभावहीन आहे त्यांनी सोने, हळद, पिवळी डाळ व पिवळे वस्त्र  यापैकी काहीही दुसर्या व्यक्तीस मनापासून प्रेमाने द्यावे. 

अध्यात्मिक व्यक्तीनी श्री गुरूकृपा होण्यासाठी जप जाप्य करावे धार्मिक अनुष्ठान करावे. वस्त्र व खाद्धपदार्थांचेही दान करावे. 

कोणतेही कार्य करताना या गुरूमुळेच दैवी पाठींबा मिळतो. म्हणूनच या नक्षत्राला शुभ नक्षत्र व सत्वगुणी नक्षत्र असे म्हंटले आहे. 

***********************************************. *******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *