daily horoscope

सोमवार 04 आँक्टोबर 2021 भाद्रपद कृष्ण त्रयोदशी श्राद्धाची माहिती

Read in

सोमवार 04 आँक्टोबर 2021 भाद्रपद कृष्ण त्रयोदशी श्राद्धाची माहिती

मवारी भाद्रपद कृष्ण पक्षातील त्रयोदशी असल्याने या दिवशी त्रयोदशी श्राद्धाचा दिवस आहे. ही तिथी युगादी आहे. प्रथम युगादी तिथी म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊ.

सत्ययुगाची सुरूवात कार्तिक शुद्ध नवमीला झाली.

त्रेता युगाची सुरूवात वैशाख शुक्ल तृतीयेला झाली.

द्वापार युगाची सुरूवात  माघ कृष्ण अमावास्या ही आहे.

कलियुगाची सुरूवात भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला झाली आहे.

वरील तिथीना प्रत्येक युगाचा आरंभ झाल्याने या तिथीना युगादी तिथी म्हंटले जाते. या तिथीवर केलेले प्रत्येक कार्य अखंड टिकते व त्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणूनच या तिथींवर दान, जप-जाप्य  करण्याचे सांगितले आहे. या तिथी विषयीचे स्कंदपुराणात अतिशय विस्तृतपणे वर्णन केले आहे (1). भाद्रपद कृष्ण त्रयोदशी ही तिथी युगादी असल्याने या दिवशी श्राद्ध केले असता पांचशे वर्षेपर्यंत पितर तृप्त होतात. म्हणूनच ही तिथी पितरांना अतिशय प्रिय आहे. या त्रयोदशीस मघा नक्षत्र असल्यास  उदकानी केलेल्या श्रादधानेही पितर संतुष्ट होतात व ते लाखोवर्षापर्यंत  तृप्त होतात. हे श्राद्ध मधाने किंवा पायस म्हणजे दुधात शिजवलेल्या तांदळाच्या खिरीने करावे असा शास्त्राचा आधार आहे. या श्राद्धामुळे संतुष्ट झालेले पितामह मनुष्याला, वंशवृद्धी, कीर्ती, आरोग्य, आणि धन दौलत देऊन कृपा करतात. हे श्राद्ध ही नित्य आहे.  हें श्राद्ध विभक्त किंवा अविभक्त यांनी वेगवेगळे करावे. “ सूर्य हस्त नक्षत्रास गेल्यावर जी मघा नक्षत्रावरील त्रयोदशी येते ती यमाची असल्याने तीला गजच्छाया असे म्हणतात. या दिवसासाठी पितर अशी आशा धरून असतात कीं या दिवशी मधुघृताने युक्त असलेले पायस अर्पण करणारा आपल्या कुळातील कोणी होईल काय? ” ( 27 सप्टेंबर सोमवार रोजी सूर्याने सकाळी 06:41 ला हस्त नक्षत्रात प्रवेश केला आहे.) जरी मघा नक्षत्र नसले तरीही त्रयोदशीस महत्व असल्याचे वेगवेगळ्या अधिकारी ऋषीनी सांगितले आहे. ( चंद्रिका, प्रयोगपारिजात, पृथ्वीचंद्रोदयात, हेमाद्री, मनुवचनात, विष्णुधर्मवचनात, वस्ष्ठवचनात, याज्ञवल्कात,  बृहपराशरवचनात,) या व्यतिरिक्त तर  कांहीनी करू नये असेही सांगितले आहे. पण या कलीयुगातील अनुभव असा आहे की या श्राद्धामुळे कोणतीही हानी न होता अनेक प्रकारचे लाभच होतात.

1) (स्रोत :– निर्णयसिंधु  श्री मत्पदवाक्यप्पमाणापारावारपारणिमहोपाध्याय श्री कमलाकरभट्ट विरचित)

|| शुभं-भवतु ||

********************************************************

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *