Read in
नमस्कार मित्रमंडळी,
पितृपक्ष व त्याचे महत्व या विषयावर लिहायची माझी इच्छा नव्हती पण बर्याच जणांनी ‘श्राद्ध ’ या विषयावर इतके प्रश्र्न विचारले कीं शेवटी हे ५–६ दिवस होऊन गेल्यावर आत्ता लिहायचे ठरवले. असो
श्राद्ध म्हणजे पितरांच्यासाठी, त्यांच्या आत्म्याच्या तृप्ततेसाठी श्रद्धा भावानेने जे अर्पण केले जाते ते म्हणजे श्राद्ध होय.
आपण सर्व मानव प्राणी आपल्या आईवडीलांना परमेश्र्वरासमान मानतो. म्हणूनच जन्मभर आपण आपल्या आईवडीलांची सेवा करतो. ज्यांनी आपल्याला हे जग दाखवले आहे. त्यांचे ऋण मानतो. मनुष्यावर एकूण तीन प्रकारचे ऋण आहे. 1) पितृऋण 2) देवऋण. 3) ऋषि ऋण. या पितृ ऋणामध्ये आपले फक्त जन्मदाते नसून सर्व आप्तांचा सहभाग येतो. म्हणूनच आपण जन्मभर त्यांच्या सुखाचा, आनंदाचा विचार करतो. म्हणूनच की काय त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या आत्म्याला योग्य गती मिळण्याकरता पुत्र संततीला विशेष अधिकार दिले आहेत व ते एक त्यांचे कर्तव्यच ठरले आहे. पण जेथे पुत्र नाही तेथे या नव्या युगात मुलींनाही हे विधी करणे शक्य झाले आहे.
मृत्युनंतर मनुष्याच्या देहाला आपण ‘ प्रेत ’असे संबोधित करतो. परंतु मृत्युनंतर मनुष्य देहातील आत्मा हा सूक्ष्म शरीर धारण करतो. या सूक्ष्म शरीररूपी आत्म्यास मोह, माया, भूख तसेच तहान या इच्छा असतात. या इच्छा पूर्ण करणारे विधी युक्त श्राद्ध केल्यानंतर प्रेतयोनीमधे असणारे पितर , वर्षभर तृप्त होऊन पितरयोनीमधे जाण्यासाठी त्याना गती प्राप्त होते.
पितृपक्षातील श्राद्ध हे एकोद्धीष्ट म्हणजे फक्त एकाच व्यक्तीचे नसून या वेळी आईकडील मागिल तीन पिढ्या व वडीलांकडील मागिल तीन पिढ्यांचे करीता तर्पण केले जाते.
भाद्रपद प्रतिपदेपासून ते अमावास्ये पर्यंत हे महालय श्राद्ध करता येते. परंतु काही कारणांमुळे हे श्राद्ध करणे शक्य झाले नाहीतर रवी तूळ राशीमधून वृश्चिकेला जाईपर्यंत हा कालावधी असतो. म्हणजे दोन महिन्यांचा कालावधी आहे. या वर्षीचा रवीचा वृश्र्चिक राशीतील प्रवेश मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी 13:01 वाजता आहे. ज्यांच्या कडून या पितृपक्षात श्राद्ध झाले नाही व होऊ शकणार नाही त्यानी हा कालावधी लक्षात ठेवावा.
पुढील लेखात आपण पितृपक्षातील सप्तमी पासून ते भाद्रपद कृष्ण अमावास्ये पर्यंतच्या श्राद्धविधींची माहिती घेऊया.
देववाणी ज्येतिषालय
अनुराधा कोगेकर.
26 सप्टेंबर 2021
*******************************************************