weekly-horoscope-2020

रविवार 30 मे 2021 ते शनिवार 05 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.

Read in

रविवार 30 मे 2021 ते शनिवार 05 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.

रविवार 30 मे चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा. 16:41 पर्यंत व नंतर श्रवण.

weekly-horoscope-2020

सोमवार 31 मे
चंद्ररास. मकर 27:58 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 16:01 पर्यंत व नंतर धनिष्ठा. 01 जून चंद्ररास कुंभ
दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 16:06 पर्यंत व नंतर शततारका. बुधवार 02 जून चंद्ररास कुंभ दिवसरात्र व
चंद्रनक्षत्र शततारका 16:48 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. गुरूवार 03 जून चंद्ररास कुंभ 12:06 पर्यंत व नंतर मीन.
चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 18:33 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. शुक्रवार चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा
भाद्रपदा 20:46 पर्यंत व नंतर रेवती. शनिवार 05 जून चंद्ररास मीन 23:26 पर्यंत व नंतर मेष. नक्षत्र रेवती
23:36 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
मंगळाचा कर्क राशीतील प्रवेश 06:50 ला आहे.

मेष :– नोकरीतील कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळणार असल्याचे संकेत मिळतील. समाजातील तुमची पत
वाढल्याचे जाणवेल व समाजाकडून प्रशंसा होईल. राजकीय क्षेत्रातील व्यवहार तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार
करता येणार आहे. कुटुंबातील मंडळीनी एकत्र बसून विचार केल्यास व्यवसायाच्या बाबतीत सर्वाना मंजूर
असलेला निर्णय घेता येईल. घरातून रागवून निघून गेलेल्या पत्नीला मनवणे पती राजांना फारच कठीण जाणार
आहे. प्रमोशनच्या बाबतीत स्वत:हून नोकरीत सिनीआँरिटी सोडून द्यावी लागेल. तुमच्या अचानक विचार न
करता खर्च करण्याच्या सवयीमुळे खूप मोठी आर्थिक तंगी निर्माण होईल.

वृषभ :–न्यायसंस्थेत पेडींग राहिलेल्या कामाकडे या सप्ताहात लक्ष द्यावे लागेल. कोर्टाच्या कामातून मुक्त
करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाँसजवळ विनंती करावी लागेल. नव्याने सामाजिक क्षेत्रात काम करणार्यांना
त्यांचे मित्रमंडळी पाठीराखे म्हणून उभे राहतील. आजारपणातून बरे वाटलेल्यांना फार मोठ्या दिवसातून
वाचलो ही भावना राहील. कुलदैवताची व त्याचबरोबर आराध्य देवतेची करत असलेल्या उपासनेचे फळ मिळत
असल्याचे जाणवेल. वडीलांसाठी तुम्ही करत असलेल्या कामातून वडीलाना आनंद होईल. मोठ्या प्रमाणातील
होर्डींगच्या कामातील तुमचा सहभाग विशेष कौतुकास्पद असेल.

मिथुन :–मान. आयुक्त, उच्चायुक्त यांच्या सारख्या सरकारी कार्यालयाशी या सप्ताहात तुमचा वारंवार संबंध
येईल. शासकीय कागदपत्रांवर मंजूरी आणणे, सह्या घेणे यासारख्या कामाची जबाबदारी तुमच्यावर
सोपवण्यात येईल. हा सप्ताह विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी लाभदायक ठरेल. जोडीदाराच्या
नावाने नव्याने गुंतवणूक करण्यास हरकत नाही. उधारीवर कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नका, तसेच
हप्त्यानेही खरेदी करू नका . खूपच जवळच्या व्यक्तीच्या आजारपणातील काळजी मुळे मानसिक ताण वाढून
बेचैनी येईल. राजकीय क्षेत्रात तुमच्या शत्रूचे शत्रू जवळीक करण्याचा प्रयत्न करतील.

कर्क :– समाजातील तुमच्या शब्दाला असलेली कींमत पाहून मनाला आनंद वाटेल. व्यवसाय क्षेत्रातील तुमचे
धाडस पाहून अभिमानाने मन भरून येईल. तुमच्या एकांतवासात बसून काम करण्याच्या सवयीवर कुटुंबातील
ज्येष्ठांकडून आँब्जेक्शन घेतले जाईल. पण कामाचा स्पीड व उरक पाहून मनाला समाधान वाटेल. तरूणांनी
कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका हा मूलमंत्र या सप्ताहात महत्वाचा राहील. वयस्कर मंडळीना व तरूणांना
पाईल्सचा त्रास पुन: सुरू होईल. दैनंदिन काबाडकष्ट करणार्‍यांना भरपूर स्वकमाईचा आनंद मिळेल.
नोकरीतील अधिकार वापरण्याच्या प्रवृत्तीवर कांही प्रमाणात बंधन घालावे लागेल.

सिंह :– वेदनादायी आजार असलेल्याना अचानक दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. दिव्यांग व्यक्तीना
मिळणारी नोकरीची संधी त्यांनी सोडू नये. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मनातील विचार ओळखून तरूणानी
वागावे. स्त्रीयांना मासिक धर्माचा किंवा मोनोपाँजचा त्रास संभवतो. पोलिस, होमगार्ड यांना अचानक बदनामीचे
प्रसंग येतील व प्रतिष्ठेची हानी होईल. जोडीदाराच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीकडून
मानहानीचा प्रसंग येईल. संमोहन शास्त्राच्या अभ्यासकांना वेगवेगळ्या लहरींचा अनुभव येईल. अंत:स्फूर्तीने
केलेल्या उपासनेतून मन:शांती मिळत असल्याचे जाणवेल.

कन्या :–वैवाहिक जोडीदार विषयीच्या अवास्तव कल्पनाना जास्त थारा देउ नका. स्वत:च्या मनाने निर्णय
घेण्याऐवजी ज्येष्ठांची मदत घ्या. वयस्कर मंडळीनी आज घरा बाहेर जाताना आरोग्याचे सर्व निकष पाळावेत.
पतीपत्नीमधील मतभेद दूर करण्यासाठी आवडत्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावे लागेल. व्यावसाईक मंडळीनी
आर्थिक उलाढाली करताना अचानक स्वत:च्या एकतर्फी मताने निर्णय घेऊ नये. तरूणांच्या मनातील सुप्त
विचारांवर विचार करण्याची वेळ आलेली आहे. कुटुंबातील वडिलार्जित व्यवसाय पुढे सुरू ठेवण्याबातची चर्चा
होईल.

तूळ :–कुटुंबात तुमच्या घरी अचानक चुलत घराकडील पाहुणे येतील. शेतीतील कामाविषयीच्या चर्चा करण्यात
मोठा अभिमान वाटेल. व्यवसायासाठी शेतीचा कसा उपयोग करून घेता येईल याचा विचार प्रामुख्याने केल्यास
कांहीतरी लाभदायक गोष्टी केल्याचा आनंद मिळेल. वडिलांच्या अधिकारातील बाबीत तुम्ही हात घालू नका.
नोकरदार मंडळीना जून्या नोकरीच्या व्यवहारातून बाकी असलेले येणे मिळणार असल्याचे अधिकारी
व्यक्तीकडून कळेल. सासरी एकत्र कुटुंबात असलेल्या सुनांना सासरकडून मिळणारे सर्व प्रकारचे धन
सहजप्रकारे तुमच्याकडे सोपवले जाणार आहे.

वृश्र्चिक :–बेटींग, जुगारात खेळणारे व जुगारअड्डा चालवणार्‍या दादा लोकांना जेरबंद व्हावे लागेल व मोठी
रक्कम दंडापोटी भरावी लागेल. नृत्यकलेतील तरूणींना आँन लाईन प्रशिक्षण देता येणार असून त्यास भरपूर
दादही मिळणार आहे. फोटोग्राफीची आवड असलेल्यांनी तज्ञ फोटोग्राफरच्या हाताखाली मनापासून काम
केलयास आत्मविश्वासात वाढ होईल व अभ्यासाची योग्य दिशा मिळेल. एकतर्फी प्रेमाच्या व्यवहाराचा त्रास

होणार्‍यानी कोणतीही गोष्ट सहजपणाने घेऊ नये. मानसिक त्रासाबरोबर प्रतिष्ठेला ही बाधा येणार आहे.
मित्रमंडळींच्या मदतीने अवघड क्षणीही मार्ग काढाल.

धनु :–गँरेजमधील मेकॅनिक्स व इतर नोकर मंडळीना दुसर्‍याच ठिकाणी स्वत:चे गँरेज सुरू करता येणार आहे.
भांडवलाची गरज अगदी अगदी लंगोटीयार मित्राकडून पूर्ण होणार आहे. लहान मुलांच्या शिकवणीचे तसेच
संस्कार वर्गासाठी तुमच्या मैत्रिणीच्या मदतीने आँनलाईन वर्ग सुरू करता येणार आहेत. या सर्व कामात वडील
भावंडाचा सल्ला लाभदायक राहील. दवाखान्यातून डिसचार्ज मिळण्यात झालेल्या अडचणींवर तुम्हाला उपाय
सापडेल. पायाच्या तळव्यांची आग सहन होणार नाही तरी डाँक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. उत्तम लेखकांची
ध्वनीफीत ऐकायला मिळेल व त्यातून आनंद मिळेल.

मकर :–तुम्ही स्वत: कष्ट करत नसलेल्या व्यवसायातून कोणत्याही प्रकारचे अव्वाच्या सव्वा पैसे मिळणार
नाहीत. गिर्‍हाईक वस्तूंच्या किंमतीचा विचार करून मगच विकत घेईल. घरगुती व्यवसायातून रोजच्या पेक्षा
या सप्ताहात चांगला आर्थिक लाभ होईल. तरूणांना आँन लाईनच्या माध्यमातून लेखन कला शिकता येणार
आहे. तुम्हाला जे वाहन विकायचे आहे त्याला चांगला भाव येणार आहे तरी उगाच घाई करू नका. नोकरीतील
कामाचा ताणतणाव सध्या तरी कमी होणार नाही आहे हे समजून घ्या. लहान मुलांच्या हातात काचेच्या वस्तू
देऊ नका फुटण्याचा संभव आहे व मुलांच्या हाताला जखम होण्याचाही धोका आहे.

कुंभ :–घरातील कपाटाचे किंवा तिजोरीचे लाँक असे बसेल की ते तुम्हाला उघडताच येणार नाही. किल्लीवाल्याला
बोलवावे लागेल. कोरोनाचा कालावधी असल्याने आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळून त्याला बोलवा. घरासाठी
काढलेले कर्ज फेडता येणार असूनही लगेच ते पूर्ण फेडण्याच्या मागे लागू नका. 14,15 जूनला तुमची आर्थिक घडी
कांही प्रमाणात विस्कटणार आहे तरी तो विचार करा. स ध्या नव्याने गुंतवणूकीच्या पण मागे लागू नका.
नकलाकार मंडळीना त्यांच्या व्हीडीओजना समाजाकडून चांगली दाद मिळेल व अचानक व्हिडीओ
पाहणार्‍याच्या संख्येत वाढ होईल.

मीन :–तुम्हाला या सप्ताहात तुमच्या अंगभूत असलेल्या सवयीचा त्रास होणार आहे. आवाजातील मार्दवता
कमी झाल्याने समोरील व्यक्तीचा गैरसमज होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे
आवश्यक राहील. हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या कडून होणार्‍या चुकांची शिक्षा देणारा ठरेल. व्यवसायातील
व्यवहार रोखीने करण्यापेक्षा चेकने करा. आँन लाईन सुद्धा करू नका. महिलांना स्वकष्टार्जित धनाचा
इतरांसाठी वापर करता येणार आहे. घरातील दुरूस्तीच्या कामासाठी मित्रांची मदत मागण्याच्या विचारात
असतानाच अचानक मित्र येईल व मदतही मिळेल.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *