Read in
रविवार 09 मे 2021 ते शनिवार 15 मे 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 09 चंद्ररास मीन 17:27 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 17:27 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
सोमवार 10 मे चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 20:24 पर्यंत व नंतर भरणी. मंगळवार 11 मे चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी 23:30 पर्यंत व नंतर कृतिका. बुधवार 12 मे चंद्ररास मेष 06:17 पर्यंत व नंतर वृषभ चंद्रनक्षत्र कृतिका 26:39 पर्यंत व नंतर रोहिणी. गुरूवार 13 मे चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 29:44 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. शुक्रवार 14 मे चंद्ररास वृषभ 19:12 पर्यंत व नंतर चंद्रनक्षत्र मृगशीर्ष अहोरात्र. शनिवार 15 मे चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 08 :38 पर्यंत व नंतर आर्द्रा. वरील प्रत्येक दिवसाच्या राशी व नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मंगळवार 11 मे रोजी अमावास्या आहे. याच दिवशी पिंड पितृयज्ञ विधी केला जातो. याच अमावास्येला पितृ – देवकार्य अमावास्या असे म्हणतात. शुक्रवार 14 रोजी अक्षय्य तृतीया आहे. श्री गौरीमातेचा दोलोत्सवाची समाप्ती याच दिवशी केली जाते. याच दिवशी श्री परशुराम जयंती आहे. या वैशाख तृतीयेला पुनर्वसु नक्षत्रावर रात्रीच्या प्रथमप्रहरी मिथुन रास असताना सहाही ग्रह उच्चीचे होते. त्या वेळेस श्री रेणुकामातेच्या गर्भातून श्री परशुराम अवताराचा जन्म झाला.
मेष :–तुमचा परदेशी संस्थेबरोबर असलेला करार किंवा परदेशाशी संबंधित असलेल्या व्यवसायातील अडचणींवर तुमच्या तीव्र मानसिक इच्छेने मात कराल. कोरोनाच्या भितीमुळे जरी प्रवास करता येणार नसला तरी तुमची कोणतीही कामे अडणार नाहीत. तुमच्या कष्टाळूपणामुळे इतरांची मदत होऊन काम किंवा वस्तू तुमच्यापर्यंत चालून येईल. नवीन नोकरीचे स्वप्न पहायला हरकत नाही. शेजारच्यांच्या मदतीमुळे कुटुंबातील अडचणीला सामोरे जाण्याची ताकद वाढेल. आजारी नसलेल्यांनाही आपल्याला नक्की काय झाले आहे याचा नुसता विचार न करता आवश्यक ती तपासणी करून घ्या. सध्या कोणतेही निर्णय फक्त तुमच्याच विचाराने न घेता इतरांचेही सहकार्य घ्या.
वृषभ :–व्यवसायासाठी लागणारे भांडवल कर्जाच्या रूपात सहजपणे मिळत असल्याचे कळेल. परगावी असलेल्या बहिणीस घरी आणण्यासाठी बरीच खटपट करावी लागेल. सरकारी बँकेच्या कर्ज विभागातून निरोप येईल. गेल्या महिन्यात दिलेल्या मुलाखतीतून तुमची निवड झाल्याचे कळवले जाईल. नोकरीचे ठिकाण जिल्ह्यातच राहील. आरोग्य विभागातील कर्मचार्यांना कामाचा ताण खूपच जाणवणार आहे. पण त्याचबरोबर सामाजिक स्तरावर तुमचे कौतुक होऊन आभार मानले जातील. जाहिरात क्षेत्रातील तरूणांना त्यांच्या नवनवीन कल्पनाना समाजाने उचलून धरल्याचा अनुभव येईल.
मिथुन :–शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे क्लासमधे प्रवेश मिळेल. बुद्धीच्या जोरावर मुलांना मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य व कला छंद जोपासण्याचे शिक्षण घेता येणार आहे. मित्राच्या अडचणीसाठी त्याच्याबरोबर पोलिस स्टेशनला जावे लागेल. वृद्ध महिलांना अचानक विस्मरणाचा त्रास होऊ लागेल. गृहिणींना सासूबाईंच्या मदतीने स्वयंपाकघरातील महत्वाच्या टिप्स मिळतील. ज्यांचा घरगुती खाद्धपदार्थ्रांचा व्यवसाय आहे त्यानी योग्य वेळी आपले मत व्यक्त केल्यास व्यवसाय वृद्धिचा नवीन मार्ग सापडेल.
कर्क :–संशोधन कार्यातील मान्यवरांना सध्या करत असलेल्या कामातून वरच्या लेवलमधे सामावून घेतले जाईल. सप्ताहाच्या सुरूवातीलाच येणार्या कार्यालयातील अडचणींच्या वेळी मित्रांची सहकार्यांची किती गरज आहे याची जाणिव करू देईल. कौटुंबिक जीवनात निर्माण होणार्या मतभेदावर शांतपणे विचार करा म्हणजे अतिरेकी पाऊल उचलले जाणार नाही. आपली प्रिय व्यक्ती परगावी असल्यास सप्ताहाच्या शेवटपर्यंत तुम्हाला भेटण्याचा योग आहे. गेले वर्षभर तुम्ही सोडलेल्या संकल्पाचे नीट पालन होत असल्याची खात्री करून घ्या.
सिंह :–कुटुंबातील इतर व्यक्तींकडून अती टापटिपीची अपेक्षा करू नका. फक्त वादच निर्माण होतील. सध्याच्या कोविडच्या साथीमधे तुम्ही हाती घेतलेले आर्थिक मदतीचे कार्य इतरांकडून कौतुकास पात्र होईल. सरकारी योजनांतून चालणार्या पण अडचणीत सापडलेल्या उद्योगासाठी आर्थिक मदत कराल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयावर जाहिर बोलण्याची संधी मिळेल. लेखक व कवी यांच्याकडून नवनवीन विषयावरील पण सामान्य माणसाना विचार करायला लावणारे लेखन होईल. लहान मुलांसाठी महिलांच्या मदतीने अभ्यासाचे वर्ग चालवले जातील. मोबाईल हरवण्याचा धोका आहे.
कन्या :–मुलांच्या बाबतीत संस्कार व वळण या विषयावरील चर्चेत आईवडिलांची एकवाक्यता राहणार नाही. शैक्षणिक विषयावर केलेल्या चर्चेमधून कांहीही निष्पन्न होणार नाही. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींवर निर्णय सोपवावा. टेक्निकलच्या क्षेत्रातील कर्मचार्यांना टेक्निकल हेड्सना कामातील झालेल्या चुकीबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल. बांधकाम क्षेत्रातील मंडळीना जनक्षोभाला व अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल. महिलांनी आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे.
तूळ :– लक्षणिय यश मिळवलेल्या तरूणांना नवीन नोकरीची चांगली संधी मिळेल. आवश्यक ते धाडस करावे लागेल. अजोळकडील मंडळींकडून मुलांच्या अभ्यासावरील नियोजन ठरवले जाईल. कलाकार मंडळीना नवीन संस्थेमधे सामावून घेतले जाईल. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केल्यास व्यवसाय वृद्धीचा नवा मार्ग सापडेल. प्रकाशन व्यवसायातील प्रकाशकांना योग्य कामाची निवड करण्याची जबाबदारी सोपवली जाईल. कौटुंबिक अडचणींवर मार्ग सापडल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल.
वृश्र्चिक :–कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल. पोलिस खात्यातील कर्मचार्यांनी व अधिकार्यांनी कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा देऊ नये प्रकरण तुमच्यावरच उठण्याची भिती राहील नोकरीत बदली किंवा बढती यासारख्या सुखावह घटना घडतील व मानसिक समाधान मिळेल. आर्थिक फायदा मात्र अगदी कमी प्रमाणातच होणार आहे. डोक्यावर असलेले बँकेच्या कर्जाचे ओझे कमी करण्याचा वडिलांच्या मदतीने प्रयत्न कराल. ज्येष्ठांच्या इच्छेखातर कुटुंबात नातेवाईक मंडळीना बोलवून सहभोजनाचा आनंद घ्याल. अचानक महागडी वस्तू खरेदी कराल.
धनु :–व्यवसायात कामगार वर्गाचे उत्तम सहकार्य मिळाल्याने कामाचा अपेक्षित रिझल्ट मिळेल. महिलांना नोकरीचे काम घरातून करताना अगदी तारेवरची कसरत करावी लागेल. नोकरीतील कामाच्या प्रेशरमुळे घरातील कामाकडे दुर्लक्ष होईल. नात्यातील आजारी व्यक्तीसाठी आर्थिक मदत कराल. 13 व 14 हे दोन दिवस बाहेर जाण्याचे टाळावे कोरोना साथीचा त्रास संभवतो. लहान मुलांना घेऊन बाहेर जाऊ नका. तरूण वर्गाने आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केल्यास सुखवस्तू खरेदी करता येणार आहे. एखादी जूनी जागा नजरेच्या टप्प्यात येईल व ती विकत घेण्याची इच्छा होईल.
मकर :–वयस्कर मंडळीना अचानक मूत्र विकाराचा त्रास होईल. आजारपणावर योग्य उपचार घेण्यास प्राधान्य द्या. संततीच्या उत्कर्षाबाबतची स्वप्ने मार्गी लागत असल्याचे जाणवेल. अचानक मुलांच्या शाळा बदलण्याचा विचार करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तरूणांचे मत विचारात घेतल्यास नवीनच मार्ग सापडेल व रिलँक्स व्हाल. सध्या तुम्हाला प्रवासाचे योग असल्याने तसे प्रसंग निर्माण होतील तरीही प्रवासाचा विचारही करू नये. दिव्यांग मंडळीना सरकारी योजनांतून मिळणार्या संधी मिळतील व आर्थिक मदतही मिळेल.
कुंभ :–नोकरीतील गेल्या वर्षी पासून रखडलेल्या प्रोजेक्टवर नव्याने काम करण्याकरीता सामावून घेतले जाईल. तरूणांनी स्वत:च्या व्यवसायातही नवीन फंडे वापरण्याची तंत्रे शोधून काढावीत. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल तरी प्रवासाची कोणतीही रिस्क घेऊ नका. महिलांची एखाद्या प्रशिक्षणासाठी निवड होईल. तुम्हाला स्वत:बरोबरच कुटुंबाच्या आरोग्यासाठी बारकाईने काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी स्वत:चे हट्ट चालवू नयेत. ज्येष्ठांनी डाँक्टरनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.
मीन :–नोकरीत घडणार्या सुखद घटनांमुळे तुमच्या विषयी वातावरण तुम्हाला अनुकूल राहिल. तसेच वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. उत्पादन क्षेत्रात काम करत असाल तर प्रथम मागणीकडे लक्ष द्या व बाजारपेठेचा विचार करा अन्यथा नुकसान संभवते. कुटुंबातील आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. घरातील पुरूष मंडळीना कुटुंबातील जबाबदारी उचलावी लागेल व दैनंदिन कामात हातभार लावावा लागेल. नोकरदार वर्गाने फारशी गुंतवणूक करण्याचा विचार करू नये. जेष्ठ मंडळीनी पूर्णत: बाहेर जाणे बंद करून धार्मिक वाचन, जपजाप्य यावर भर द्यावा.
||शुभं-भवतु ||