Read in
|| बुधवार 21 एप्रिल 2021 चैत्र शुक्ल नवमी श्री रामनवमी ||
|| बुधवार 21 एप्रिल 2021 चैत्र शुक्ल नवमी श्री रामनवमी ||
चैत्र शुद्ध नवमी हा श्री प्रभूरामचंद्रांचा जन्मदिवस. अगस्त्यसंहितेत असे सांगितले आहे की “ चैत्र शुद्ध नवमीस दिवसास पुण्य पुनर्वसु नक्षत्री गुरू व चंद्र हे लग्नी असतां व पांचग्रह उच्चीचे असताना तसेच सूर्य मेष राशीस असताना, कर्कलग्नी कौसल्येचा ठायी परपुरूष ( नारायण ) अंशाने प्रकट झाला. ही चैत्र नवमी पुनर्वसुयुक्त असते तेव्हा उपवास केल्यास सर्व मनोरथ इच्छा पूर्ण होतात. ही श्रीरामनवमी कोटी सूर्यग्रहणाहूनही अधिक आहे. श्री रामनवमीची तिथी नवमीची आहे मग जरी त्या दिवशी पुनर्वसू नक्षत्र नसले तरीही हा नवमीचा उपवास करावयाचा आहे. म्हणून सर्वानी हे उपोषण व्रत करून आपले मनोरथ पूर्ण करण्याची प्रार्थना करावी.
. बुधवार 21.एप्रिलला चैत्र शुद्ध नवमी आहे. ही नवमीची तिथी बुधवारच्या रात्री 24:34 पर्यंत आहे. पुनर्वसु नक्षत्र मंगळवारी पहाटे 06:52 ला संपून पुष्य नक्षत्र सुरू होत आहे. व बुधवारीपुष्य नक्षत्रही सकाळी 07:58 मिनीटापर्यंत आहे व आश्लेषा सुरू होत आहे. श्री प्रभूरामचंद्राची जन्म तिथी नवमी असल्याने आपण नवमीचाच विचार करणार आहोत. नवमीची तारीख 21 वार बुधवार आहे. व नवमीची सुरूवात मंगळवारच्या रात्री 24:42 म्हणजेच 21 एप्रिलला ला सुरू होत आहे. तर बुधवारच्या 24:34 पर्यंत म्हणजे 22 एप्रिल पर्यंत आहे. त्याच दिवशी कर्क लग्न 11:54 ते 02:07 या वेळेत आहे. याच कर्क लग्नावर श्री प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. ज्या वेळी श्री प्रभूरामचंद्रांचा जन्म झाला त्यावेळी पांचही ग्रह उच्चीचे होते. आजही बुधवारी
- रवि मेष राशीत उच्चीचा आहे व रवि बरोबर बुध आणि शुक्र आहेत. हे सर्व दशमभावात आहेत.
- चंद्रकर्केलास्वराशीतआहे.
- शनि सप्तमात स्वगृही आहे.
- पांचही ग्रहांचा उत्तम असा योग बनत आहे.
- नवमीची तिथी रात्री 12:34 पर्यंत आहे.
- कर्क लग्न 11:54 ते 02:07 या वेळेत आहे.
श्री प्रभूरामचंद्रांचा जन्म मध्याह्न 12 नंतर झाला होता त्यामुळे आपणही हा जन्मसोहळा बुधवारी दुपारी 11:03 ते 01:29 या कर्क लग्नावर मुहूर्तावर करावयाचा आहे. ( या वेळा मुंबईच्या आहेत.)
रामनवमीचा मध्याह्न मुहूर्त :– दुपारी 01:00:30 असा आहे.
वरीलप्रमाणे असलेले ग्रहांचे योग हे फक्त लाभदायक नाहीत तर मानवी जीवनाला समृद्ध व सुखी करणारे आहेत.
श्री प्रभूरामचंद्रांचे नांव म्हणजेच रामनाम होय. या रामनामामधे ‘र ‘ ‘ अ ‘ आणि ‘ म ‘ असे तीन वर्ण आहेत. हे वर्ण फक्त वर्णच नसून ते अग्निबीज, सूर्यबीज आणि चंद्रबीज याचेच प्रतिक आहे. मनुष्य प्राण्याच्या जीवनातील कळत नकळत घडलेल्या पातकांना अग्निबीजाने जाळून टाकून सूर्यबीजाने पवित्रता देउन, चंद्रबीजाने शितलता देणारे हे पर दिव्य असे नाम आहे. आयुष्यभरात काहीही करता आले नाहीतरी या दिव्य नामाच्या जपाने, नामस्मरणाने भगवंत आपला उद्धार करेल याची खात्री आज प्रत्येकाला पटलेली आहे. वाल्या कोळीचे परिवर्तन महर्षि वाल्मिकी यामधे कसे झाले हे ही आपल्याला ठावूकच आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी पण रामनामाचा महत्व सांगताना म्हणतात,
“ बहु चांगले नाम या राघवाचे |अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे |
करी मूळ निर्मळ घेता भवाचे | जीवा मानवा हेची कैवल्य साचे ||”
आपणा सर्वांना रामरक्षेचे महत्व माहितच आहे पण तरीही मला तुम्हाला पुन: सांगावेसे वाटते.
श्री बुधकौशिक ऋषीनी रामरक्षेची रचना केली आहे. या रामरक्षेतील प्रत्येक श्र्लोक हा एक स्वतंत्र अस्तित्व असलेला तेजाने भारलेला मंत्रच आहे. त्या मंत्रातील शक्ती ही मनुष्याची सर्व दु:खे हरण करणारी आहे. कोणत्याही प्रसंगी म्हणता येणारे साधे, सोपे मंत्र म्हणजेच रामरक्षा होय. या श्र्लोकांमधे मनुष्याच्या हर तर्हेच्या पीडा, भिती याना पळपून लावण्याची अचाट शक्ती आहे. अमानवी शक्तींपासून रक्षण करणारे हे मंत्र म्हणजे संजीवनी मंत्रच आहेत. यज्ञा मध्ये श्री प्रभू रामचंद्रांचा हविर्भाग अर्पण करताना या रामरक्षेतील प्रत्येक श्र्लोकानंतर “ इदं रामचंद्राय इदं न मम ” असे किंवा ‘ स्वाहा ‘ हा मंत्र म्हणून हवन करावे.
संपूर्ण रामरक्षा म्हणता येत नसेल तर निदान त्यातील बीजमंत्र तरी म्हणावा.
रामरक्षेतील बीजमंत्र
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् |
लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्||
हा मंत्र कोणत्याही कामासाठी, घराण्याचे दोष, मानसिक त्रास, संतती दोष, स्वप्नदोष, अचानक येणारी आपत्ती संकटे यांचा त्रास दूर होण्याकरीता उपयोगी पडतो. ज्यांच्या कडे वेळ नाही, हे कारण आहे किंवा खरेच वेळ नसलेल्यांनी किमान रोज सकाळी 13 वेळा व सायंकाळी 13 वेळा म्हणावा. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी रोज किमान 1 माळ किंवा जास्तीत जास्त 13 माळा जप करावा. रविवारपासून सुरूवात करावी. प्रभूरामचंद्रांवर भिस्त ठेवून केलेली उपासना म्हणजे दारी असलेला कल्पवृक्ष होय.
अशा या श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्म दिवशी आपण आपल्या उद्धारासाठी या बीजमंत्राच्या जपाचा संकल्प करूया.
||जय श्री राम. ||
||श्रीराम जय राम जय जय राम||श्रीराम जय राम जय जय राम ||श्रीराम जय राम जय जय राम ||
| शुभं-भवतु ||