daily horoscope

चैत्र शुक्लप्रतिपदा गुढीपाडवा 13-April-2021

Read in
चैत्र शुक्लप्रतिपदा गुढीपाडवा

लेखांक सत्तेचाळीसावा :—

चैत्र शुक्लप्रतिपदा गुढीपाडवा

मंगळवार 13 एप्रिल 2021 . स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शके  1943  प्लवनाम संवस्तर.

चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा  सकाळी 10:17 पर्यंत.   गुढीपाडवा

मंगळवार  13 एप्रिल 2021  ला चैत्र शुक्लप्रतिपदा असल्याने याच दिवशी नवीन संवत्सराचा आरंभ होतो.  “चैत्रमासीं शुक्लपक्षीं प्रथम दिवशी सूर्योदयीं ब्रह्मदेवाने सर्व जग निर्माण केले. ‘’  या प्रथम दिवशी म्हणजे प्रतिपदेस सूर्योदयाचा जो वार असतो तोच वार वर्षपति असतो. ही चैत्र प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतुचा प्रारंभ होय. या दिवशी  तेल लावून अभ्यंगस्नान करून ब्रह्देवाचे  पूजन करावे व उपोषण करावे. कारण श्री वसिष्ठवचन असे आहे की, “  चैत्राची प्रतिपदा, वर्षाचा प्रथम दिवस, वसंत ऋतुचाही प्रथमच दिवस, या दिवशी तेल लावून अभ्यंगस्नान करण्याने वर्षभर सर्व सुखे प्राप्त होतात. ’’

हिंदु नवीन संवत्सराची सुरूवात होते.  यावर्षी  शके  1943 चे नांव प्लवनाम असे आहे. मार्कंडेयपुराणांत असे सांगितले आहे की” वर्षारंभाच्या वेळी व वसंतऋतुच्या आरंभाला महापूजा करतात. याच वर्षारंभाला चैत्र देवी नवरात्राची सुरूवात होत असून त्याची समाप्ती 21  एप्रिल  बुधवार रोजी होत आहे.

13  तारखेला मंगळवारी सूर्योदय 06:24 वाजता  आहे. सूर्योदय होताच अभ्यंगस्नान करून गुढी उभी करावी. “” “ब्रह्मध्वजाय नम: “असे म्हणून यथाशक्ती गुढीची पूजा करावी. दारांना फुलापानंची तोरणे बांधावीत व दारावर आंब्याची डहाळी खोचावी. आपल्या घराण्याच्या कुलदेवांची, घरातील इतर देव देवतांची  व गुरूची पूजा करावी. ज्यांच्या घरी पंचांग आहे त्यांनी पंचांगावर असलेल्या श्रीगणेशाची पूजा करावी. पंचांगामधे दिलेले  वर्षफल कुटुंबातील सर्व सदस्यांनी मोठ्या भक्तीभावनेने  ऐकावे. स्त्रीया व मुलांनी नवीन कपडे घालावेत व दागदागिने  घालून घरातील प्रसन्नता वाढवावी. गुढीच्या पूजनानंतर पुढील प्रार्थना म्हणावी.

“ ब्रह्मध्वज नमस्तुभ्यं सर्वकल्याणकारक || मद्गृहे कुरू कल्याणं सर्वकामार्थसिद्धिदम् ||

आज गुढीपाडवा म्हणजेच वसंतरऋतुच्या आगमनाचा दिवस. याच दिवशी श्रीरामनवरात्राला  प्रारंभ होतो. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने  किंवा फुले,  त्यात जिरे, ओवा, मीठ किंवा सैंधव, मिरे, भाजलेला हिंग, थोडीशी  चिंच इत्यादी पदार्थ घालून बारीक वाटावे  व मिष्ठान्न भोजनासह  देवास  याचा नैवेद्य दाखवावा. या मिश्रणातील सर्व पदार्थ हे आयुर्वेदीक तत्त्वाचे असल्याने व हे अमृतासमान असल्याने ते  आरोग्यवर्धक  गुण देतात.

सूर्यास्त 06:54  वाजता असल्याने त्यावेळी पुन:  स्नान करून बालचंद्रमाव्रत करावे. आकाशातील चंद्राची किंवा तांदुळाचे चंद्रबिंब करू त्याची “ बालचंद्रमनसे नम: “ असे म्हणून पूजा करावी. पुढे संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याच्या चंद्र दर्शनाच्या दिवशी हे व्रत केल्यास अपेक्षित सुखाची  व भाग्याची प्राप्ती होते. या दिवशी तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

नुकताच फाल्गुन महिना संपून चैत्राची सुरूवात झालेली आहे व या प्रतिपदेच्या गुढीपाडव्याच्या शुभ दिवसापासून वाटसरूंना पाणी देण्यास आरंभ करावा. यासच प्रपादान असेही म्हणतात. हाच उपक्रम पुढे चार महिने सुरू ठेवावा पण जर शक्य नसेल तर  थंड पाण्याने भरलेला व वस्त्राने मुखाला वेष्टन केलेला असा घट गुरूजींना द्यावा. पुढील मंत्र म्हणून जो हा धर्मघट देईल त्याला प्रपादानाचे फल मिळून त्याचे मनोरथ पूर्ण होतात.

श्र्लोक :–एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मक: || अस्य प्रदानात्सकला मम संतु  मनोरथा : ||

14  तारखेला बुधवारी गौरी शंकराची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी.  शंकरपार्वतीस दवणा वहावा. महिनाभर रोज  देवी व महादेव ताम्हणात घेऊन पूजा करून पुन: झोपाळ्यावर ठेवावेत.

15 तारखेला गुरूवारी तृतीया ही तिथी असल्याने  गौरीतृतीया आहे. या दिवशी शिवयुक्त गौरीदेवीस कुंकु  वस्त्र, मणिमंगळसूत्र, सुगंधिद्रव्य, गंध, चंदन यांनी यथाविधी  पूजन करून दवणाही अर्पण करावा व धूप दीप यांनी ओवाळावे. त्यानंतर देवीला पाळण्यात घालून आंदोलन करावे.

16  तारखेला विनायक चतुर्थीला श्री गजाननाला दवणा वाहून त्याला लाडूचा नैवेद्ध अर्पण करावा.

17  तारखेला शनिवारी  पंचमी ही तिथी आहे. ही तिथी कल्पादि तिथी आहे. या तिथीस शुभानना लक्ष्मी श्री विष्णूच्या आज्ञेने ब्रह्मलोकापासून मनुष्य लोकात आली. त्यामुळे या दिवशी तिचे पूजन केल्याने ती लक्ष्मी पूजन करणार्‍या पासून कधीच दूर जात नाही. या तिथीला दिलेले दानही अक्षय होते.

18 तारखेला रविवारी  श्री कार्तिकस्वामींना दवणा वहावा.

19  तारखेला सोमवारी  सूर्याला दवणा वहावा.

20  तारखेला मंगळवारी अष्टमी ला श्री दुर्गाष्टमी आहे. याच दिवशी श्री भवानीमातेची उत्पत्ति झाली. या दिवशी देवी भवानीचे दर्शन घेतल्यास अनेक दुखे नाहीशी होतात. तसेय या तिथीला पुनर्वसु नक्षत्रावर अशोककलिका प्राशन कराव्यात. पुनर्वसु नक्षत्र सकाळी 06:53  पर्यंत असल्याने आठ अशोककलिकांचे प्राशन करावे.

21  तारखेला बुधवारी चैत्र शुद्ध नवमी ही संपूर्ण भारत देशात  मोठी नवमी मानली जाते. ही रामनवमी आहे. याच दिवशी श्री प्रभूरामचंद्रांचा जन्म झाला. ही रामनवमी कोटि सूर्यग्रहणांपेक्षाही अधिक आहे. रामनवमीला उपोषण व जागरण करावे.  पितरांच्या उद्धेशाने तर्पणही करावे. ज्याच्याकडे  श्री प्रभूरामचंद्राची मूर्ती आहे त्यानी माध्यान्ही कर्क लग्नावर मोठ्या थाटामाटात  श्री रामजन्मोत्सव करावा.( प्रभू रामचंद्रांचा जन्म कर्क लग्नावर झाला आहे) गौरीदेवीला दवणा वहावा याच दिवशी देवी नवरात्रीची समाप्ति होते.

अशा प्रकारे गुढीपाडवा, श्री देवीनवरात्र व श्री रामजन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूया.

| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *