Read in
गुरूवार 14 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
आज चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 29:03 पर्यंत व नंतर धनिष्ठा.
वरील दोन्ही राशी चा व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
{ आज मकरसंक्रांत आहे. आज सकाळी 08 वाजून 15 मिनीटांनी सूर्य मकर राशीमधे प्रवेश करत आहे. संक्रांती पुण्यकाल सकाळी 08 :15 ते दुपारी 04:15 पर्यंत आहे. हे संक्रमण बव करणावर होत आहे. तिचे वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. तिने पांढरे वस्त्र परिधान केले आहे. तिने कस्तुरी तिलक लावला असून तिच्या हातात भुशृंडी हे शस्त्र आहे. ती अन्न भक्षण करत असून तिची जाती देव आहे. तिचे वारनाव नंदा आहे व नाक्षत्रनांव महोदरी आहे. ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे व अग्नेय दिशेकडे पहात आहे.
जन्म नक्षत्रावरून येणारे संक्रांतीचे फळ पुढीलप्रमाणे आहे.
अश्र्विनी – व्यथा. (2) भरणी, कृतिका, रोहिणी – शरीरपिडा. (3) मृग , आर्द्रा, पुनर्वसु,, पुष्य, आश्लेषा, मघा. – – वस्त्रादिकांची प्राप्ती. (4) पूर्वा, उत्तरा, हस्त. – द्रव्यनाश. (5) चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ. (6) उत्तराषाढा , श्रवण, धनिष्ठा. – –प्रवासयोग. (7) शततारका, पूर्वा भाद्रपदा., उत्तरा भाद्रपदा, रेवती..
संक्रांतीच्या पुण्यकालात नवीन भांडे, तीळांनी भरलेले भांडे, लोकरी कापड, तूप, सोने, भूमी, कपडे गाय, घोडा इत्यादी गोष्टींचे आपल्या ऐपतीप्रमाणे दान करावे.}
( संदर्भ :– कालनिर्णय पोठे पंचांग, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर संस्थापित, संपादित श्री. जयेंद्र साळगावकर, श्री. विद्याधर करंदीकर )
मेष :–कुटुंबात कोणत्याही साध्या कारणानेही आनंदोत्सव साजरा केला जाईल. तुमच्या कर्तबगारीनुसार उद्धोगाची संधी चालून येईल संधी दवडू नका. विद्यार्थ्यांना आपल्या महत्वाकांक्षेनुसार प्रयत्नात बदल करावा लागेल.
वृषभ :–आज तुमच्या हातात असलेल्या वेळेचा प्रत्येक क्षण सत्कारणी लागेल. गरजवंतांना तुम्ही केलेल्या मदतीमुळे त्यांचे मार्ग खुले झाल्याचे कळेल. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
मिथुन :–तुमच्या क्षमतेनुसार पेलणारा्या जबाबदार्या स्विकारा. विद्यार्थ्यांनी आपला गोल सतत लक्षात ठेवूनच काम करावे. पोलवर चढणार्यानी विशेष लक्षात ठेवावे की आज एखादी मेजर दुखापत होण्याचा धोका आहे.
कर्क :–व्यवहारात नियमांचे कडकपणे पालन न केल्याने शिक्षा मिळेल. वडिलांच्या नात्यातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चौकशी करा. लहान मुलांच्या पायाचे दुखणे पुन: डोके वर काढेल. पालकांनी दुर्लक्ष करू नये.
सिंह :– मुलांचा अग्रेसिव्हनेस वाढेल. आईसाठी नवीन वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण कराल. घरगुती वातावरणात अपेक्षित बदल घडेल. कुटुंबात विवाहेच्छूंच्या कार्याविषयीची बोलणी सुरू होतील. कोणत्याही कामाची घाई करू नका.
कन्या :– तरूणांच्या प्रेमप्रकरणात वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मोठ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अजोळकडील नात्यातील मंडळी घरी येतील. ज्येष्ठ मंडळींच्या मनातील विचारांचा सुगावा लागणार नाही.
तूळ :– मनासारखे होत नसल्याचे खापर दुसर्यांवर फोडाल. परिक्षेच्या बाबतीत उदासीन राहणार्या मुलांना शिक्षकांकडून ताकीद मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्यांना विशेष पुरस्कार मिळणार असल्याची बातमी मिळेल.
वृश्र्चिक :–सामाजिक पातळीवर वागताना भान ठेवून वागावे लागेल. कोणालाही कमी लेखू नका. महिलांनी मनातील भावना जवळच्या मिमंडळींपेक्षा कुटुंबियांपुढे व्यक्त कराव्यात. व्यावसायिक कामात इतरांची मदत घेऊ नका.
धनु :–समाजासाठी कांहीतरी करण्याची संधी मिळेल. कुटुंबात संततीकडून आनंदात बातमी कळेल. तरूणांना स्वावलंबनाचे महत्व कळेल व पटेलही. वारसा हक्काने मिळणार्या वस्तूंचा आदर करावा. राजकीय मंडळीना प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याची संधी मिळेल.
मकर :–सेमिनारमधील कामाचा परफाँर्मन्स उत्तम राहील. महत्वाच्या कामातील यशाचे क्रेडीट तुम्हालाच मिळणार आहे. व्यवसायातील चढ उतारावर मार्ग सापडेल व त्यानुसार कामाची योग्य ती वाटणी कराल. नोकरीमध्ये आज कष्ट वाढणार आहेत.
कुंभ :– राजकीय मंडळीना आपले हित कशात आहे हे पाहूनच वागावे लागेल. आई वडीलांच्या इच्छेनुसार व सल्ल्यानुसार व्यवसायात घडामोडी किंवा बदल करा. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता व्यवहारात वागावे लागेल.
मीन :– हातातील कामाला महत्व देऊन मगच पुढील नियोजन करा. बँकेच्या एफ डी संदर्भात नव्याने विचार करावा लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका. विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करता येईल अशी मेहनत घेण्याचे ठरवावे.
|| शुभं-भवतु ||