|| रमा एकादशीची वेळ व पुजाविधी ||
11 नोव्हेंबर 2020 बुधवार रमा एकादशी
रमा एकादशी बुधवारी पहाटे 03:22 मिनीटांनी सुरू होत असून बुधवारच्या रात्री 24:41 मिनीटापर्यंत आहे. तसेच गुरूवारी द्वादशीचा पारणा व त्याचबरोबर गुरूद्वादशी व वसुबारस आहे.
रमा हे विष्णुपत्नी लक्ष्मीचेच दुसरे नांव आहे. या दिवशी श्री विष्णु रूपातील कृष्णाची व श्री लक्ष्मीची पूजा केली जाते. या व्रताच्या आचरणाने श्री लक्ष्मीची प्राप्ती होते व सौभाग्यवती स्त्रीयांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. पुरुषांना सांसारिक आणि पारिवारिक जीवनातील संकटांचा नाश होऊन सुखी जीवनाचा आनंद मिळतो. फक्त या सर्व गोष्टी आयुष्यभर तर मिळतातच पण मृत्यूनंतरही मोक्षाच्या मार्गाने नेतात. या व्रताने आपल्या आयुष्यातील सर्व पापांचा म्हणजेच वाईट गोष्टींचा नाश होतो.
व्रतविधी ची पद्धत:– बुधवारी सकाळी सूर्योदय 6:46 चा आहे. सूर्योदयापूर्वी उठून शुचिर्भूत होऊन नेहमीप्रमाणे संपूर्ण पुजेची तयारी करावी. आपल्या श्री कुलदेवतेला व घरातील ज्येष्ठाना नमस्कार करून पूजेच्या नियोजित ठिकाणी बसावे. चौरंगावर सुंदरसे वस्त्र घालून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती व भगवत गीता ठेवण्याची सोय करावी. पूजेमध्ये तुळशी भरपूर असाव्यात व हार, निरांजन, काळा बुक्का पण असावा. नैवैद्याला लोणी साखर असावे.
भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीस अभिषेक पात्राने अभिषेक करावा. अभिषेक करताना श्रीविष्णू च्या नामांपैकी एक नामाचा उच्चार करावा जसे:-
ll ॐ विश्वेण नमः ll
ll ॐ माधवाय नमः ll
या नामाने गंगाजलच्या पाण्याने किंवा दुधाने 108 पळ्या घालून अभिषेक करावा. नंतर मूर्ति वस्त्राने स्वच्छ पुसून भगवान श्रीकृष्णाला कुंकूम मिश्रित अक्षता अर्पण कराव्यात. त्यानंतर अंगावर रेशमी वस्त्र घालून सुवासिक फुलांचा हार घालावा. भगवान श्रीविष्णूच्या नामोचचरणांनी तुलसी पत्र अर्पण करावे किंवा तुलसी पत्राचा हार घालावा. यानंतर भगवान श्रीकृष्णाला लोणी व साखरेचा नैवेद्य दाखवून भगवान श्री विष्णूची आरती करावी. त्यानंतर भगवत गीतेतील पाठाचे वाचन करावे. आप्तेष्टांना प्रसाद वाटावा व दुपारी सुग्रास भोजन द्यावे. दुसऱ्या दिवशी (एकादशीच्या पारण्याला) भगवान श्रीकृष्ण मंदिरामधील भक्तांना दक्षिणा व प्रसाद द्यावा.
सूचना:- व्रत करणाऱ्या व्यक्तीने तुळशीची पाने तोडू नयेत. सर्व तयारी आदल्या दिवशी करून ठेवावी.
ll शुभं भवतु ll