navratri 2020 day 1

आश्र्विन शुक्ल प्रतिपदा नवरात्रारंभ 17 आँक्टोबर 2020 लेख पहिला

Read In

 

आश्र्विन शुक्ल प्रतिपदा नवरात्रारंभ 17 आँक्टोबर 2020 लेख पहिला

navratri 2020 day 1

शनिवार 17 आँक्टोबर 2020. आश्र्विन शुक्ल प्रतिपदा  नवरात्राचा आरंभ होत आहे. भाद्रपद पौर्णिमेदिवशी प्रपितामहाच्या पूर्वीचे जे तीन पुरूष यांचे श्राद्ध करतो. त्यानंतर भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेनंतर प्रतिपदेपासून पितृपंधरवडा सुरू होतो. या भाद्रपद अमावास्ये नंतर येणारी प्रतिपदा ही घटस्थापनेची असते. ही प्रतिपदा दोन महत्वाच्या गोष्टींनी ओळखली जाते.

(आश्र्विन शुक्ल प्रतिपदेस मुलीच्या मुलाला मातामह श्राद्ध करण्याचा अधिकार दिला आहे. माता जिवंत असतानाही बाल्य अवस्थेतील मुलाने मातामह श्राद्ध करावे.  मातामह म्हणजे आईचे वडील.)

आश्र्विन शुक्ल प्रतिपदा श्रीदेवीनवरात्र म्हणजे नऊ तिथी पूर्ण होणार्या कालावधीपर्यंत करावयाची पूजा आहे. श्री महाकाली  – श्री महालक्ष्मी – श्री महासरस्वती या तीन शक्तींबरोबरच श्री दुर्गा व श्री नवदुर्गा या देवतांचीही पूजा केली जाते. श्री दुर्गा व श्री महाकाली, तसेच श्री महालक्ष्मी या देवता अनेक कुटुंबाच्या कुलस्वामीनी पण असतात. या देवतांच्या पूजा करताना प्रथम आपल्याला आपला कुळाचार करावयाचा असतो ज्यांच्या घरी नवरात्र आहे त्याच्याकडे प्रतिवर्षी प्रमाणे नवरात्र होणारच आहे पण ज्यांच्याकडे नवरात्राची पूजा होत नाही व दरवर्षी जे नातेवाईकांकडे किंवा देवळात किंवा सार्वजनिक ठिकाणी देवीची ओटी भरण्यास जातात त्यांनी काय करायचे हा प्रश्र्न अनेकांनी मला विचारल्यावर मी हा लेख लिहायला घेतला. असो…….

ज्यांच्या घरी नवरात्र नाही, देऊळेही ऊघडी नाहीत, सार्वजनिक नवरात्रोत्सव नाही म्हणून काय करावे याचा विचार करूया. घरामधे असलेली कोणत्याही देवीची मूर्ती वा प्रतिमा घेऊन ती स्वच्छ पुसून पाटावर अथवा चौरंगावर ठेवावी. व ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष पूजा करतो त्याच पद्धतीने मानसपूजा करावी. देवदेवतांची शक्ती किंवा अंश नाही असे एकही ठिकाण या पृथ्वीतलावर नाही. म्हणून आपण मनापासून करत असलेली ही मानसपूजा नक्कीच देईपर्यंत पोहोचते यात तीळमात्र शंका नाही. तरी हीच मानसपूजा कशी करायची हे याच सोबतच्या पण वेगळ्या लेखात देत आहे.

प्रथम आपण प्रतिवर्षी करणार्या पूजनाविषयी बोलुया. शनिवारी 17 तारखेला प्रतिपदा 21:01 पर्यंत आहे. देवीनवरात्र म्हणून मुख्य देवता ही देवी होय. देवीचा उपवास, स्तोत्र, पाठ व जप हे तर अंग आहे. वास्तविक अष्टमी व नवमीस हे देवीचे पूजन केले की मनुष्याच्या दुःखाचा नाश होतो म्हणजे दुःख विरहित होतो. महानवमीच्या दिवशी केलेली पूजा सर्वमनोरथ पूर्ण करणारी आहे. अष्टष्मीस किंवा नवमीस मोठ्या विस्ताराने ऐश्वर्याने पूजन करावे. या पूजेने पुत्र, आयुष्य, धन, संपत्ती ऐश्र्वर्यांचा लाभ होतो. तसेच प्रत्येक वर्षी या देवीची स्थापना करावी व  विसर्जनही करावे. यामधे उपवास, किंवा एकवेळ जेवण करूनही किंवा दोन्ही वेळा फराळाचे खाऊनही हे व्रत करता येते. सर्व वृतींवर संयम राखणे म्हणूनच की काय जमिनीवर झोपणे, व रोज कुमारीका पूजन करून तिला वस्र व एखादा अलंकार देऊन तीला संतुष्ट करावे. श्री महेश्र्वर हे दिवारूप व श्रीदेवी ही रात्रीरूपा असल्याने देवीची पूजा व रात्रीव्रत करावे. म्हणजेच रात्री भोजन न करता नक्तव्रत करावे. म्हणूनच नवरात्राचे मुख्य नियम नक्त व्रताचा आहे.

पूजाविधी आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळेल तरीही अतिशय थोडक्यात पण महत्वाचा गोष्टी आपण बघुया.

नवरात्राच्या दिवशी सकाळी मंगलस्नान करून धूत वा शुभ्र वस्त्र नेसून कपाळाला गंध लावून आसनावर बसावे. पूजेची सर्व तयारी करून स्थापन केलेल्या दुर्गादेवी किंवा प्रतिमेची वा मूर्तीची व्यवस्थित पाच उपचारांना पूजा करावी. देवीची पूजा जयंती मंत्राने किंवा नवाक्षर मंत्राने करावी देवीच्या मंत्राने  दुध तूप यांनी अभिषेक करावा.  नंतर आपण उपासना कशा प्रकारे करणार आहे त्याचा संकल्प करावा. शापोद्धार मंत्राचा ७ वेळा, उत्किलन मंत्राचा २१ वेळा व मृतसंजीवनी मंत्राचा ७ वेळा जप करावा. त्यानंतर सप्त श्लोकही दुर्गास्तोत्रम , देव्याकवचम, अलर्गलास्तोत्रम श्रीदेव्यअथर्वशीर्षम यांचे वाचन व देवीचे पूजन करावे.

शुद्धमृत्तिकेची वेदिका करून त्यावर सप्तधान्य गोधूम व यव पेरावे व समंत्रक यथाविधी कुंभ स्थापन करावा. हा कुंभ सोन्याचा, रूप याचा, तांब्याचा, किंवा मातीचाही चालतो. यासच घटस्थापना असे म्हणतात. यानंतर रोज एक अशी फुलांची माळ अर्पण करावी. व या घटासमोर अखंड तेवणारा नंदादीप लावावा. दुसरे दिवसापासूनची पूजा पुढील लेखात देत आहे

1))शापोद्धार मंत्र :–  ७ वेळा म्हणणे.

ॐ र्ही क्लीं श्रीं क्रां क्रीं चण्डिकादेव्यै

शापनाशानुग्रहं कुरू कुरू स्वाहा||

2)) उत्कीलन मंत्र :–२१ वेळा म्हणणे.

ॐ श्रीं क्लीं र्हीं सप्तशती चण्डिके

उत्कीलन कुरू कुरू स्वाहा||

3)) मृतसंजीवनी मंत्र :–७ वेळा म्हणणे.

ॐ  र्हीं  र्हीं  वं वं ऐं ऐं मृतसंजीवनी विद्धे. |

मृतमृत्थापयोत्थापय क्रीं र्हीं वं स्वाहा||

 

||    शुभं – भवतु ||

One thought on “आश्र्विन शुक्ल प्रतिपदा नवरात्रारंभ 17 आँक्टोबर 2020 लेख पहिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *