Read In
II श्रीदुर्गायै नमः II
श्री दुर्गा मानसपूजा
मानसपूजा याचा अर्थ मनाने एकरूप होऊन देवाची केलेली पूजाअर्चा. आपण अडचणीत सापडलोय मनात अतिशय तीव्र इच्छा असूनही कांहीही करू शकत नाही त्यामुळे मनाला हतबल व्हावे लागते व यांवर या नवरात्रात आपल्याला श्री दुर्गा देवीची भक्ती करण्याची मिळालेली संधी आपण मानसपुजेच्या सहाय्याने पूर्ण करणार आहोत. श्रीदुर्गातंत्रामधे दुर्गा मानसपूजा कशी करावी याचे संस्कृत श्लोक दिले आहेत तेच मी आपल्यासमोर आणत आहे. ज्यायोगे आपल्याला प्रत्यक्ष श्री दुर्गा पूजेचे मनाला व अंतःकरणापासून आनंद व समाधान मिळेल. ज्यांच्या घरी नवरात्र नाही, देऊळेही उघडी नाहीत, सार्वजनिक नवरात्रोत्सव नाही म्हणून काय करावे याचा विचार करूया. घरामधे असलेली कोणत्याही देवीची मूर्ती वा प्रतिमा घेऊन ती स्वच्छ पुसून पाटावर अथवा चौरंगावर ठेवावी. व ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष पूजा करतो त्याच पद्धतीने मानसपूजा करावी. देवदेवतांची शक्ती किंवा अंश नाही असे एकही ठिकाण या पृथ्वीतलावर नाही. म्हणून आपण मनापासून करत असलेली ही मानसपूजा नक्कीच देवीपर्यंत पोहोचते यात तीळमात्र शंका नाही. तरी हीच मानसपूजा कशी करायची हे या लेखात देत आहे.
||श्री दुर्गा मानसपूजा ||
१) हे त्रिपुरसुंदरी! तू आम्हा भक्तांच्या मनःकामना पूर्ण करणारी आहेस. हे माते! वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या मौल्यवान अशा मोत्यांची, पोवळ्यांनी रत्नांनी, घडविलेल्या या पादुका आहेत. अनेक देवस्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या हातांनी उत्तम चंदन व कुंकुमिश्रित लाल जलधारांनी स्वच्छ धुवून, पुसून स्वच्छ केलेल्या या पादुका मी अतिशय भक्तीपूर्वक, आदरपूर्वक तुझ्या चरणी समर्पित करत आहे.
(असे म्हणून आपल्या हाताने समोर ठेवलेल्या पाटावर त्या पादुका स्थापित कराव्यात.)
२) हे माते! देवांनी तुला बसण्यासाठी हे दिव्य आसन आणले आहे. त्यावर तू स्थानापन्न हो. तेजस्वी अशा स्वर्णराशींपासून घडवलेले हे सिंहासन आपल्या तेजाने लखलखत आहे. आपल्या मनोहर प्रभेने सदैव प्रकाशमान राहणार्या या सिंह आसनाची देव इंद्र देवही व सर्व देवता अतिशय भक्तिभावाने पूजा करतात. हे माते! दिव्य अशा युवतीनी तुझ्या सेवेसाठी हे चाफ्याच्या व केवड्याच्या सुगंधाने परिपूर्ण असलेले असे सुवासिक उटणे व तेल अत्यंत आदरपूर्वक प्रस्तुत केले आहे तरी याचा स्विकार कर.
( असे म्हणून दोन्ही ओंजळीतून पायावर वहावे)
३) हे देवी! हे शिवप्रिये! आता सर्व सुगंधी पदार्थ घालून आत्यंतिक सुवासिक झालेला हा आवळ्याचा कल्क तू स्वीकार कर. हे त्रिपुरसुंदरी! हा कल्क तू आपल्या केसांना लाव. मग थोड्या वेळाने फणीने केस विंचरून तू गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान कर. हे माते! स्नानानंतर हे दिव्य गंध तुला समर्पित करत आहे. याने तुझा आनंद वृद्धिंगत होवो.
(असे म्हणून नजरे समोरील देवीच्या प्रतिमेला अर्पण करावे.)
४) संपत्ती प्रदान करणार्या हे वरदायिनी त्रिपुरसुंदरी! आता या श्रेष्ठ, शुद्ध कस्तुरीचा तू स्वीकार कर. ही कस्तुरी आपल्या हाती घेऊन देवराज इंद्राची पत्नी शची स्वतः येथे उभी आहे. यात कस्तुरी चंदन, कुंकुंम व अगुरू मिसळलेले असल्याने ही अधिकच चांगली झालेली आहे. हिच्या श्रेष्ठ सुगंधाने मन मोहून जाणार आहे.
(असे म्हणून कस्तुरी चंदनाने भरलेली ओजळ वहावी.)
५) माते श्री सुंदरी!
हे निर्मल आणि उत्तम असे वस्त्र तुझ्या सेवेत समर्पित करत आहे. या वस्त्राने तुझा आनंद वृद्धिंगत होईल. केशरी रंगाचा हा पितांबर देवांच्या, गंधर्वांच्या आणि किन्नरांच्या सुंदर स्त्रियांनी आपल्या करकमळात भरला आहे. हा पितांबर सूर्यमंडळासारखा प्रकाशमान आणि दिव्य प्रभेने युक्त असून तो अतिशय शोभायमान दिसत आहे.
(असे म्हणून हा पितांबर व वस्त्र देवीला समर्पित करावे)
६) हे माते तुझ्या दोन्ही कानांमधील स्वर्ण कुंडलं झगमगत आहेत. तुझ्या करकमळातील एका बोटात अंगठी शोभत आहे. तुझ्या कटीभागावरील कमरपट्टा झळकत असून तुझ्या पायातील पैंजण रुणझुणत आहे. तुझ्या गळ्यातील हार रुळत आहे व तुझ्या मनगटातील कंकणे खणखणत आहेत. तुझ्या मस्तकावरील दिव्यमुकूट तुला व तुझ्या भक्तांना आनंद देत आहे. हे सर्व अलंकार मी तुला प्रेमपूर्वक अर्पण करत आहे. याचा स्वीकार कर.
(असे म्हणून प्रत्येक वस्तू देवतेच्या अंगावर वाहावे)
७) हे धनदायिनी शिवप्रिया पार्वती! ही चमकणारी सुंदरशी कंठी तू आपल्या गळ्यात घाल. तुझ्या ललाटाच्या मध्यभागी सौंदर्य चिन्ह म्हणून हा सिंदुर तिलक लाव. तुझ्या दिव्य औषधीपासून तयार केलेले हे काजळ तुझ्या नेत्रांना लाव.
(असे म्हणून सर्व वस्तू देवीला वाहाव्यात)
८) हे पापनाशिनी धनदायिनी त्रिपुरासुंदरी! या आरशामध्ये तू तुझे मुखसौंदर्य पाहा. प्रत्यक्ष मदनाची रती तुझ्या सेवेसाठी येथे उपस्थित आहे. मंदार पर्वताची रवी करून क्षीरसागराचे मंथन करण्यात आले. त्यावेळी हा आरसा प्रकट झाला आहे. याला चोहोबाजूंनी पोवळे जडवलेले असून हा चंद्रकिरणांप्रमाणे चमकत आहे.
(असे म्हणून प्रतिमेसमोर आपल्या उजव्या हाताचा आरसा दाखवावा)
९) हे शांभवी ! हे अंबिके! देवांगनांनी मस्तकावर धारण केलेल्या रत्नजडीत कलशातून आणलेले हे निर्मळ जल तू ग्रहण कर. हे जल चाफा, गुलाब, कस्तुरी अर्क, चंदन, अगुरु इ. द्रव्यांनी केले असून अमृताच्या धारेनेही ते युक्त आहे.
(असे म्हणून प्रतिमेस अभिषेक करावा)
१०) मी निळे पांढरे कमळ, नागकेशर, मल्लिका, केतकी, कुमुद, लाल कणेर, कमळ इ. सुगंधित पुष्पमालांनी व पंचामृतांनी अभिषेक करून या कमळात निवास करणार्या श्री भगवती चंडिकेची पूजा करत आहे. (असे म्हणून उजवा हात हृदयाला लावावा.)
११) हे चंडिका देवी! हा धुप अतिशय सुवासिक असून तो रत्नजडित पात्रात ठेवलेला आहे. देव स्त्रियांनी जटामासी, गुग्गुळ, चंदन, शीलाजित, मध, कुंकुंम, कापूर, अगुरू चूर्ण व त्यात साजूक तूप मिसळून केला आहे. तरी याचा स्वीकार कर.
(असे म्हणून धूप दाखवावा)
१२) हे त्रिपुर सुंदरी! सुवर्णाच्या पात्रात ठेवलेल्या या दिव्याला रत्नजडित दांडी बसवलेली असून कापसाची घट्ट वात लावलेली आहे. हा दीप विश्वातील मोठ्यात मोठ्या अंधाराचा नाश करणारा आहे.
(असे म्हणून देवीला ओवाळावे)
१३) हे चंडिके! हा नैवेद्य उत्कृष्ट जातीच्या तांदूळ चमेलीच्या वासाने युक्त असा रूचकर भात आहे. त्याच बरोबर हिंग, मीरे, जिरे इ. सुगंधी पदार्थांचा वापर करून इतर पदार्थ बनवले आहेत. या नैवेद्य पात्रात विविध पक्वाने, खीर, मध, दही व नाजूक तूपही आहे.
(असे म्हणून नैवेद्य दाखवावा)
१४) हे माते! आता रत्नजडित सुंदर पात्रातील हा दिव्य विडा स्वीकार कर. या विड्यामध्ये कोवळी जायपत्री, कापूर व सुपारी घालून लवंग कळी टोचलेली आहे.
(असे म्हणून विडा समर्पित करावा)
१५) हे महात्रिपुरसुंदरी माता पार्वती! , सोन्याच्या दांडीने बनवलेले शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे चमकणारे तेजस्वी व सुंदर असे हे छत्र तू स्वीकार कर. याची मोत्याची झालर गंगेच्या प्रवाहासारखी दिसत आहे.
(असे म्हणून देवतेच्या डोक्यावर छत्र धरावे)
१६) हे माते! चंद्र आणि कुंदपुष्पासारखी पांढरी शुभ्र अशी ही चवरी घामाचा वास दूर करणारी आहे. तुझा आनंद वृद्धंगित करणारी आहे. तसेच म. अगस्ती, म. वसिष्ठ, म, व्यास. म. नारद आणि म. वाल्मिकी इ. मुनिवर्यांनी उच्चारलेले वेदमंत्राने तुझा आनंद वृद्धिंगत होवो.
(असे म्हणून चवरीने ढाळण्याची कृती करावी)
१७) हे माते! स्वर्ग लोकांतील अंगणात वेणु, मृदंग, शंख आणि भेरींच्या मधुर ध्वनींच्या संगीतात सर्व कोलाहल लुप्त होतात. त्या संगीताद्वारे सादर केली जाणारी नृत्यकला तुला सुखावह होवो.
(असे म्हणून उजवा हात हृदयाला लावावा)
१८) हे देवी! या तुझ्या भक्तीभावाने भरलेल्या स्त्रोत्रांत माझ्या भक्तीचा अंश जरी तुला मिळाला तरी तू माझ्यावर प्रसन्न हो..तुझ्या भक्तीतील माझी व्याकुळता हेच माझ्या जीवनाचे साफल्य आहे. तुझी कृपा नसेल तर कोटी जन्म घेऊनही हे साध्य होणार नाही.
(असे म्हणून भक्तीभावाने नमस्कार करावा)
१९) जो मनुष्य या मनःकल्पित श्री त्रिपुर सुंदरीची मानसपूजा करून तिची स्तुती करतो, त्याच्याकडून देवीला सर्व पूजा प्रत्यक्ष केल्याचे पुण्य मिळते.
(असे म्हणून अंतःकरणापासून नमस्कार करावा)
या प्रमाणे श्री दुर्गामानस पूजा पूर्ण झाली आहे.
वरील १९ श्लोक हे दुर्गातंत्रातील असून नवरात्रात याचा रोज एक पाठ केल्यास प्रत्यक्ष देवीची पूजा केल्याचे समाधान मिळेल.
II शुभं भवतु II
मराठी मध्ये खूप छान सांगितले आहे
Atisahy sunder Ani upyogi mahiti
Chhan mahiti
Upaukta mahiti