Read In
अधिक महिन्याचे महत्व
आज आपण अधिक मास म्हणजे काय व त्याचे काय महत्व आहे ते समजून घेऊया. ते समजण्यासाठी आपल्याला प्रथम, वर्ष म्हणजे काय इथून सुरूवात केली पाहिजे.
काळ :– काळ म्हणजे वर्ष, अयन, ऋतु, मास(महिना) पक्ष(पंधरवडा जसे कृष्णपक्ष व शुक्लपक्ष) आणि दिवस. वर्षाचे पाच प्रकार आहेत. सावन, सौर, चंद्र, नाक्षत्र आणि बार्हस्पत्य.
आपण कोणताही संकल्प करताना संकल्पात जो महिन्याचा ऊल्लेख करतो तो आपला चांद्रमास म्हणजे मराठी महिना असतो. जो अमावास्ये नंतरच्या प्रतिपदेला सुरू होऊन पुढील महिन्याच्या अमावस्येला संपतो.
आता आपण अयनचा विचार करूया. सौरऋतु तीन म्हणजे एक अयन. प्रतेक महिन्याला सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो त्याला त्या राशीची संक्रांत असे म्हंटले आहे. जसे १४ जानेवारीला सूर्य मकरेत प्रवेश करतो ती मकर संक्रांत. या नुसार दर महिन्याला सूर्य आपल्या गतीने प्रत्येक पुढील राशीत प्रवेश करतो.
यावरूनच आपण असे समजून घेऊया, सौरऋतु तीन म्हणजे एक अयन. अयन दोन प्रकारचे एक दक्षिणायन व दुसरे उत्तरायण. कर्क पासून ६ संक्रांती म्हणजे धनु संक्रांती पर्यंत दक्षिणायन व मकरसंक्रातीपासून मिथुनसंक्रातीपर्यत उत्तरायण. इंग्रजी महिने जानेवारी १४, १५ सूर्य मकरेला जातो त्यानुसार पुढील महिने आपल्याला मोजता येतील. उत्तरायणात कार्तिक अमावास्या झाल्यावर १५ डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होते. जूनच्या १४ तारखेला सूर्य मिथुनेत प्रवेश करतो. उत्तरायण सुरू होते.म्हणून या भ्रमणाचा विचार केला तर आपल्याला समजून येईल की प्रत्येक महिन्याच्या १५, १६ च्या दरम्यान सूर्य नवीन राशीत प्रवेश करतो. म्हणूनच आपल्या आयुष्यात घडणार्या घटनांचा अचूक अंदाज येतो.
आता वर उल्लेखलेल्या ज्या १२ महिन्याच्या १२ संक्रांती आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्या प्रत्येक संक्रांतीच्या पुढेमागे कांही कालावधीत काय करावे, काय घडणार आहे याचाही अंदाज घेता येतो. जसे अगदी दानधर्म, पूजाअर्चा एवढेच काय श्राद्ध सुद्धा आपल्या जन्म नक्षत्रावर केले असता आपल्या इच्छा पूर्ण होतात
.मुख्यतः दोन पक्ष मिळून कृष्णपक्ष व शुक्लपक्ष मिळून एक महिना होतो. शुक्ल प्रतिपदेपासून ते अमावास्ये पर्यंतचा जो कालावधी तो चांद्रमास होय.
आता अधिकमासाविषयी बोलुया. अधिकमासाचा कालावधी म्हणजे दोन महिन्यांचा कालावधी. साठ दिवस हे २ मास आहेत. १)अधिकमास २) क्षयमास. ज्या मासात संक्रांत नाही तो अधिकमास व तो तेरावा मास होतो. आणि दोन संक्रांतीनी युक्त तो क्षयमास. हा फारच क्वचित होतो. क्षयमास हा कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या महिन्यातून कोणता तरी येतो. ज्या वर्षी क्षयमास येतो त्याच्या पूर्वी व त्याच्या नंतर दोन अधिक मास येतात. अधिकमास हा बत्तीस महिने सोळा दिवसानंतर येतो.
आता आपण अधिक महिन्यात काय करावे व काय काय करू नये ते पाहुया.
१७ सप्टेंबर २०२० गुरूवार रोजी सर्वपित्री अमावास्या दुपारी १६ : १४ मिनीटापर्यंत होती. शुक्रवार १८ रोजी चा ला सूर्योदय सकाळी ०६:२२ ला होता १६ सप्टेंबरला सूर्य कन्या राशीला संध्याकाळी ०७:०७ मिनीटांनी गेला. व १७ आँक्टोबरला सकाळी ०७:०७ वाजता तूळ राशीला प्रवेश करणार आहे. म्हणून १७ सप्टेंबर ते १६ आँक्टोबर अधिक आश्र्विन मास आहे व नंतरचा निज अश्र्विन आहे. तरी आपण या अधिक अश्र्विन मधील कार्याची माहिती घेऊया.
अधिकमासास श्री पुरूषोत्तम मास असेही म्हंटले आहे. यात उपवास, (लंघन) नक्तभोजन किंवा एकभुक्त रहावे. ज्यांना महिनाभर करणे शक्य नाही त्यांनी ४, ५ दिवस खरी पाळावे, मौन भोजन करावे. देवापुढे नंदादीप लावावा त्यामुळे लक्ष्मीप्राप्ती होते. शक्य असल्यास महिनाभर अनारशांचे दान द्यावे.गुळ व तूप युक्त असे तेहेतीस अपूप म्हणजे अनारसे तेहेतीस देवतांच्या प्रित्यर्थ द्यावेत. हे दान करणार्याला विपुल संपत्तीचा लाभ होउन सर्वांचे कल्याण होते असा शास्त्रात उल्लेख आहे. संकल्प करून आपल्याला ज्याचे दान द्यावयाचे आहे त्याचे पूजन करावे. या संकल्पात नेहमीच्याच संकल्पाप्रमाणे विधी करावा. खावयाच्या पानाचा विडा पण द्यावा. विडा देणे खूप खर्चाचे व अवघड नसल्याने हे करता येणे शक्य आहे. नेहमीची, रोजची पूजाअर्चा करावी. नामकरण विधी, लहान बाळाचे अन्नप्राशन संस्कार, करावे. जी कर्मे दैनिक आहेत ती करण्यास काहीही हरकत नाही.
तसेच गेल्या वर्षी ज्या महिन्यात निधन झाले आहे व तो अधिकमास असेल तर प्रथम वर्ष श्राद्ध याच महिन्यात करावे. उदाहरणार्थ २०१९ च्या अश्र्विन महिन्यात मृत्यु झाला असेल तर प्रथम वर्षश्राद्ध अधिक आश्र्विन मधेच व त्याच तिथीला करावे. प्रथमदिवसापासून सपिंडीकरणापर्यंत सर्व अंत्यकर्मे पुत्रजन्मनिमित्क श्राद्ध, यासंबंधी वृद्धी श्राद्ध, व सीमंत व पुंसवन व अशाच प्रकारचे अनेक नित्यकर्मात मोडणारे विधी आहेत ते तज्ञांच्या मार्गदर्शनाने करावेत. . त्याविषयीची माहिती तज्ञ ज्योतिषी किंवा गुरूजींकडून घ्यावी.
आता अधिक महिन्यात काय करू नये याचा विचार करूया.
अनित्य व अनैमित्तक कर्मे करू नयेत. महादान, पूर्वी कधीही न केलेली तीर्थयात्रा, देवदर्शन, मुंज, प्रथम राज्याभिषेक, गृहारंभ गृहप्रवेश, घर बांधणे, यात्रा, उत्सव, दिव्यकर्म, देवादिकांची शपथ हे विधी करू नयेत देवदेवतांची स्थापना, देव महोत्सव एखाद्या व्रताचा आरंभ किंवा समाप्ती करू नये. .एकूण काय हा अधिक महिना म्हणजे काहीच धोकादायक, महाभयानक नाही हे लक्षात ठेवावे. सूर्याच्या नैसर्गीक भ्रमणामुळे निर्माण होणारा हा बदल आहे. जसे अमावास्या पौर्णिमा किंवा सूर्य चंद्राची होणारी ग्रहणे यांकडे आपण ज्या वैज्ञानिक दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीने या अधिक महिन्याकडे पाहिल्यास त्याचे अवडंबर वाटणार नाही.
संदर्भ :– श्री कमलाकरभट्टविरचित निर्णयसिंधु
|| शुभं – भवतु ||
उपयुक्त माहिती
Nice and simply explation it’s really helpful
Very useful explanation.
Nice informative article.
Thanks.
Chhan mahiti
Upaukta mahiti