Read In
येत्या दीड वर्षात राहूच्या मदतीने व्यवसायात स्थिर होऊया, मालामाल होऊया.
मागील व्यवसाय व नोकरी या लेखात कृष्णमूर्ती पद्धतीत कोणते नियम लावून प्रश्न पाहिलेले जातात याचा विचार मुद्देसूदपणे मांडला होता. आज या येत्या दीड वर्षात 19 सप्टेंबरला येणारा राहू मनुष्याच्या जीवनावर कशाप्रकारे परिणाम करत आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत.
मागील लेखात आपण राहूची शुभफळे व अशुभ फळे सविस्तरपणे पाहिलेली आहेत. ( मागील लेख वाचण्यास इथे क्लिक करा)
राहूचे मित्र ग्रह शत्रू ग्रह, व दृष्टी याचा विचार करूया.
- मित्र:–बुध, शुक्र, शनी.
सम :- गुरू
शत्रू:- रवि, चंद्र, मंगळ.
- राहू हा गुणतत्वाला अशुभ फलदायी आहे.
- राहू एका राशीला 18 महिने असतो.
- दृष्टी:– राहूला आपल्या स्थानापासून 5, 7, 9 व 12 या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो
2 व 10 स्थानावर अर्धी व 3, 6 या स्थानावर पापदृष्टी असते. (ऋषी पराशर)
- स्वभाव गुण:– तमोगुण
6) दिशा :–नैऋत्य
7) धातू :–शिसे
8) धान्य :– तीळ
9) रत्न :– गोमेद
10) नीलवस्त्र व कृष्णपुष्प.
- A) गुणधर्म व स्वभाव :–अत्यंत हुशार, दांडगी कल्पनाशक्ती, उच्च महत्त्वाकांक्षा व्यवसायात निमग्न, कोणत्याही गोष्टीचा साधक बाधक विचार करणारा, गूढ व कठीण विषयांच्या विद्येची आवड स्वभावाने स्थिर, शांत, भाषण मुद्धेसूद, चोख व स्पष्ट, निर्भीड मनाचा, धंद्याविषयी उत्साही, वादविवादात कुशल, समाजकार्याची आवड व मैत्रीला योग्य हे राहूचे गुणधर्म आहेत.
राहू बलवान व शुभसंबंध असेल तर अफाट यश मिळवून देतो
सांपत्तिक उत्कर्ष, मानसन्मान, पारमार्थिक अभ्यासात चांगली गती देतो.
- B) कारकत्व :– अंधकार, काळा रंग, मायाजाल, अपंग, अंधत्व, पाशवी व अघोरी विद्या, अघोरी मंत्र विद्या, वेड, स्मृतीनाश. राहूमूळे त्याच्या कारकत्वात झालेले रोग लवकर कळून येत नाहीत. अनुमान चुकते. औषधे लागू पडत नाहीत. फारच कठीण प्रसंगातून जावे लागते खर्या अर्थाने भोग भोगावा लावतो.
राहू हा विषारी प्राण्याचा कारक असून सर्पदंश व भूतबाधेची भीती असते.
राहू हा वडिलांच्या वडिलांचा कारक आहे.
आता या राहूचा शुभगुण मिळवण्यासाठी आपण काय व कसे प्रयत्न केले पाहिजेत ते बघूया.
राहूच्या मालकीची तीन नक्षत्रे आहेत. आर्द्रा, स्वाती व शततारका. यातील आर्द्रा हे मिथुनेत येते व स्वाती तूळ राशीत आहे. शततारका कुंभ राशीत आहे. कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश पाहताना खालील बाबीचा अभ्यास करावा लागतो.
आपल्या जन्मकुंडलीत
1) कुंडलीत ग्रह किती अंशांचा आहे.
2) कुंडलीतील जे १२ भाव आहेत ते किती अंशाला सुरू होत आहेत.
3) कोणकोणते ग्रह राहूच्या वर उल्लेखलेल्या नक्षत्रात आहेत.
4) कोणकोणत्या ग्रहांचे उपनक्षत्र राहू आहे.
5) कोणकोणत्या ग्रहांचे उपउप नक्षत्र राहू आहे.
यानंतर महादशा, अंतर्दशा, विदशा व सूक्ष्म दशा कोणकोणत्या ग्रहांच्या, उप नक्षत्रांच्या व भावारंभ स्वामींच्या आहेत. त्यावरून आपल्याला वरती उल्लेखलेले राहूचे शुभगुण मिळवता येथील. मात्र अशुभ गुण नाहीसे होणार नाहीत पण त्यांची तीव्रता कमी करता येईल. म्हणून येणारे दीड वर्ष राहूच्या गुणधर्माचे फायदे घेऊया.
संपूर्ण दीड वर्षाच्या कालावधीत आपण आपली व्यवसायाची भरभराट कशी करून घ्यायची याचा कालावधी काढून त्याला असलेल्या सपोर्ट सिस्टीमचा वापर करून फायदा करून घेता येईल.
तरी मिथुन, तूळ व कुंभ राशींच्या संबंधित नक्षत्रांच्या मंडळीना मिळणारी संधी त्यांनी घालवू नये. दीड वर्ष हा कालावधी मोठा आहे. त्यात व्यवसाय असो वा इतर काहीही असो त्यात स्थिरता येऊन आपण यशस्वी होऊ शकतो. राहूची जी कारकत्व आहेत त्यांचा विचार करून आपल्या आवडीचे काम निवडा, आपला आवाका, आपल्या क्षमता यांचा विचार करा, आजूबाजूची परिस्थिती, तेथील लोकांच्या गरजा यांचा विचार करून व्यवसायाचा विचार करा.
सध्या या कोरोनाच्या संकटाने अनेक व्यवसाय, नोकर्या अडचणीत आले आहेत. अशा वेळी हतबल न होता मिथुन, तूळ, व कुंभ राशीच्या व संबंधित नक्षत्र असलेल्या लोकांनी एकत्र येऊन वा स्वतंत्रपणे अर्थार्जनाची ही संधी दवडता कामा नये. म्हणून हा लेख लिहिला आहे.
या राशी व्यतिरिक्त राशी व मित्रनक्षत्रे असलेल्यांना काही उद्योग करावयाचे असल्यास त्यांनी आर्द्रा, स्वाती व शततारका यांच्या जोडीने काम केल्यास त्याना ही यश मिळवता येईल. फक्त ज्यांची नक्षत्रे राहूची शत्रू नक्षत्रे आहेत त्यांनी हे प्रयत्न करू नयेत.
गेल्या आठ दिवसात मला अंदाजे 60/70 मेसेज आलेत. “आधीच करोनाची जीवघेणी दहशत वरून आता हा राहू दीड वर्ष आमच्या डोक्यावर बसणार. कसं होणार आमचं”. यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे.. राहूच्या शुभ गुणांचा पुरेपूर उपयोग करून घेणे.
१. राहुचे आर्द्रा नक्षत्र हे मिथुन राशीत येते म्हणून आपण मिथुन राशीतील नक्षत्रस्वामी राहू व उपनक्षत्र स्वामी सर्व ग्रहांच्या अंमलाखाली येणार्या व्यवसायांची माहिती घेऊ.
इलेक्ट्रिक सामान, शिक्षणसंस्था, मुद्रणालय, आयात-निर्यात, चपला-बूट इ. निर्माते, औषधांचे व्यापारी, प्रवासी संस्था, इमर्जन्सी सेवा, नर्सिंग होम, हॉटेल, दूध, दुग्धजन्य पदार्थ, एनर्जी ड्रिंक.
२. स्वाती नक्षत्र हे तूळ राशीमध्ये येते. म्हणून त्याच्या अंमलाखाली येणारे व्यवसाय पाहू.
इलेक्ट्रिक वायरिंग, औषध कारखाना, अकाउटंट, प्रोफेसर, इन्कमटॅक्स सल्लागार, त्वचारोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, युरोलॉजिस्ट, केशभूषाकार, लहान मुलांचे खाद्यपदार्थ तयार करणारे कारखाने. पेपर मिल, नृत्यशिक्षक, फॅशन डिझायनर, घड्याळ दुरुस्ती, दुभाषी.
३. शततारका हे नक्षत्र कुंभ राशीमध्ये येते. तरी त्यांच्या अंमलाखाली येणारे व्यवसाय पाहू.
जाहिरातसंस्था, विविध वस्तू भांडार, बेकरी, पंखे व इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती, शिवण काम, शिक्षक, चर्मकार, दूरसंचार खाते, तेल, गॅस, न्यूरोलॉजिस्ट, सॅनिटिरी साहित्य उत्पादक, त्वचारोग.
वरील व्यवसायांचा विचार करता आपल्या असे लक्षात येते की, येत्या दीड वर्षांत आपल्या हातात अनेक व्यवसाय आहेत. या पैकी वर उल्लेख केलेल्या व्यवसायांपैंकी तुमची आवड, क्षमता, आवाका, मागणी याचा विचार करून व कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडलीतील इतर ग्रहांची किती मदत मिळेल याचा आढावा घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय १०० टक्के यशस्वी करू शकता.
तरी शुभ गुणांची मदत घेऊन व्यवसायाचा विचार करूया आणि जीवनात स्थिर होऊ या.
|| शुभं – भवतु ||