Read In
राहूचा वृषभेत प्रवेश एक नैसर्गिक घटना
राहू व केतू हे दोन इतर ग्रहांप्रमाणे आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. पृथ्वीच्या भ्रमण मार्गाला चंद्राचा भ्रमण मार्ग उत्तरेकडे जाताना ज्या ठिकाणी छेदन करतो त्या बिंदूस राहू म्हंटले आहे व बरोबर त्याच्या विरूद्ध बाजूस केतू म्हटले आहे. हे संपात बिदू आहेत. हे नेहमी वक्र गतीने भ्रमण करतात. हे छायाग्रह रोज ठराविक गतीने म्हणजे ३ कला ११ विकला या गतीने व राशीचक्रात उलट रितीने फिरतात. राहुला ३६० अंश भ्रमण करण्यासाठी १९ वर्षे लागतात. एका वर्षात तो फक्त १९ अंश जातो. विशोत्तरी महादशेत राहूची महादशा १८ वर्षे असते.म्हणजेच सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास राहूला १८ वर्षे लागतात. आपल्या आयुष्यात राहू केतू ची सत्ता २५ वर्षे असते. म्हणून विशोत्तरी महादशेत राहूला केतू ला फार महत्व आहे.
चंद्राची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा सर्पाकार आहे. व त्याच कक्षेमध्ये हे बिंदू असल्याने राहू – केतू ला सर्पाकार मानले गेले आहे. इंग्रजीत राहू ला Dragon‘s head व केतू ला ‘ Dragon‘s tail असे म्हणतात.
प्रत्येकजण राहू केतू, कालसर्पयोग या शब्दांनीच घाबरून जातो म्हणून च राहूच्या प्रथम चांगल्या बाजू काय आहेत ते बघुया व नंतर त्रासदायक वाईट बाजू पण बघुया.प्रथम कालसर्प म्हणजे काय हे समजून घेऊया.
आपल्या जन्म लग्न कुंडलीत जेव्हा राहू व केतू यामध्ये सर्व ग्रह येतात तेव्हा या पोझिशनला कालसर्प योग म्हणतात. जसे एक कडक काका व एक महाकडक मामा यामधे आपण बसलोय मग आपली अवस्था काय असेल तीच अवस्था या ग्रहांची असते. बाकी फार भयानक काही नाही. पण या राहू केतूच्या नक्षत्र, उपनक्षत्रस्वामी, उप उपनक्षत्रस्वामी यांचे व इतर ग्रहांचे नक्षत्र स्वामी, उप नक्षत्र स्वामी, उपउप नक्षत्र स्वामी यांचे परस्पर संबंध जसे असतील तशा घटना घडतील.
गेले दीड वर्षापासून हाच राहू मिथुनेत आहे. शनिवार १९ सप्टेंबरला २०२० रात्री ०८.१८ मिनिटांनी राहू वृषभ राशीत प्रवेश करत आहे.व याच वेळी केतू बरोबर१८० अंश फरकाने म्हणजे वृश्र्चिक राशीत येत आहे. आज आपण राहू विषयीची माहिती घेऊया.
राहू काळा आहे धिप्पाड आहे अशा गोष्टींचा विचार करण्या ऐवजी त्याच्यामुळे आपल्याला कोणकोणते लाभ होतात व कशाप्रकारचा त्रास होतो ते पाहुया. कारण राहू व केतू हे व्यक्तीच्या फलितावर फार परिणाम करतात.
शारिरीक त्रास :- संतती न होणे, कुलक्षय, स्मृतीनाश, अंधत्व, पंगुत्व, वेड लागणे, उन्माद, मानसिक विकृती, संतती दोष अपंग, विकृत संतती देणारा, वातपीत्त वाढवणारा, भूतपिशाच्चाने झपाटलेला, लहान आंतड्यातील अल्सर, मनाला आलेली विकृती, अपूर्ण दिवसांची संतती अशा प्रकारचा शारिरीक त्रास राहू मुळे होतो. राहू हा विषारी प्राण्यांचा कारक आहे. साप, नाग चावणे, विषारी प्राण्यांपासून इजा, भूतबाधा यांचा कारक आहे.
शारिरीक त्रासाशिवाय वैयक्तिक आयुष्यात हा कशाप्रकारे परिणाम करतो ते पाहुया.
वैयक्तिक परिस्थिती :–सतत गोंधळलेला,बौद्धीक कमतरता असणारा, तात्काळ विस्मृतीत जाणारा खोटे बोलणारा, संशयग्रस्त असलेला, चांडाळ वृत्तीचा, धर्माची निंदा हेटाळणी करणारा, खूनशी प्रवृत्तीचा , सूड बुद्धीने वागणारा, नैतिक मुल्ल्यांचा नाश करणारा, हिस्टेरिया, गुन्हेगारीवृत्तीचा, आत्मघात करून घेणारा, अपवित्र विचारांचा, अशुद्ध सवयी विचार असलेला, वर्मी बोलणारा, जुगारात व्यसनात रममाण होणारा, गारूडी विद्धेचा आवड असणारा व दैनंदिन व दैवी संकटे आणणारा, दंगल घडवणारा, गुप्त कट कारस्थान करणारा, व तुरूंगवास भोगणार, वास्तुदोष करणारा, पिढीजात शाप असणारा, जीवनात विचित्र घटना घडवणारा, अगदी जीवन उध्वस्त करणारा अशा प्रकारचा परिणाम तो आपल्या जीवनावर करत असतो.
आता राहूची शुभकार्ये बघुया. .
महापराक्रमी, यशकारक, प्रतिष्ठा देणारा, मानसन्मान, सांपत्तिक उत्कर्ष देणारा व मुख्य. म्हणजे राजयोगकारक आहे. दूरदूरचे प्रवास घडवणाराही आहे. ज्या राजकारणी लोकांचा राहू शुभ असतो त्यांची अध्यात्मिक उन्नत्तीही करतो व त्यांनाच निवडणूकीत यशही मिळते व तेच आमदार खासदार म्हणून आपली कारकिर्द करतात व जेव्हा पूढील कालावधीत राहूचा अशुभ संबंध येतो, महादशा स्वामी नक्षत्रीय अशुभसंबंध तेव्हा हे अडचणीत येतात व जनता यांची बदनामी करते, तुरूंगवासाचा योग येतो इतकेच नाही तर वेड लागून भ्रमिष्ट होण्याचा धोका असतो.
सर्व ग्रहांना स्वतःच्या राशी आहेत पण राहूला स्वतःची रास नाही. वरती उल्लेखल्याप्रमाणे “*पृथ्वीच्या कक्षेला चंद्राची कक्षा ज्या दोन ठिकाणी छेदन करते ते संपात बिंदू आहेत” . व हेच संपात बिंदू म्हणजेच राहू केतू होय. त्यामूळे चंद्र व सूर्य या दोघांच्या शुभगुणावर हे वाईट परिणाम करतात. आपण कृष्णमूर्ती पद्धतीने विचार करताना आपल्याला ग्रहांच्या महादशा, अंतर्दशा, विदशा व सूक्ष्मदशा वरून या वरील गोष्टींचा कालखंड बरोबर कळतो.
ग्रहांचे उपनक्षत्रस्वामी, उप उपनक्षत्रस्वामी व राहू कोणत्या नक्षत्रात आहे, कोणाच्या उपनक्षत्रात आहे, त्याचा उपउप नक्षत्र स्वामी कोण आहे तसेच हे सर्व नक्षत्रस्वामी किती अंशांचे आहेत, त्यांचा व राहूचा परस्परसंबंध काय सांगतो यांवर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. फक्त राहू या भावात आहे व त्या भावात आहे यांवर भिती बाळगण्याची कांही एक गरज नाही.
आता आपण ग्रहणाचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो ते पाहुया.
ज्या वेळी रवी आणि चंद्र या दोन ग्रहांबरोबर राहू व केतू ची अंशात्मक युती होते तेव्हा ग्रहण होते. हेच ग्रहण आपल्या जन्मकुंडलीत आहे का किंवा होणारी नैसर्गिक ग्रहणे आपल्या कुंडलीतील कोणत्या नक्षत्राशी संबंधित आहेत हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहीजे. म्हणजे ज्या वाईट गोष्टी घडण्याचे संकेत मिळतील त्याबाबत जागरूक राहून ते टाळण्याचे प्रयत्न करता येतील व जे मिळणार आहे ते भरपूर मिळवता येईल. म्हणजेच नैसर्गिक ग्रहण आपल्याला कसे आहे हे अभ्यासणे.
तुमच्याजवळ पंचांग असेल तर शुक्रवार ५ जून २०२० चे चंद्र ग्रहण व रविवार ५ जूलै२०२० चे चंद्र ग्रहण तसेच रविवार २१ जून चे सूर्यग्रहण या ग्रहणादिवशीचे राहू केतू चे अंश व चंद्र सूर्याचे अंश तपासा म्हणजे कल्पना येईल.
आता आपण राहूची नक्षत्रे पाहूया. राहूची एकूण तीन नक्षत्रे आहेत.
- आर्द्रा हे मनुष्य गणी व शुभ आहे. व या नक्षत्रात एकच तारा आहे.
- स्वाती हे देवगणी व अशुभ आहे व या नक्षत्रात एकच तारा आहे.
- शततारका हे राक्षसगणी व कल्याणप्रद आहे व यामध्ये शंभर तारे आहेत.
- राहूचे रत्न गोमेद आहे यामध्ये लाल, वीटकरी, पिवळा असे रंग असून त्यांचे गुणधर्मही वेगवेगळे आहेत व त्याचे उपयोगही वेगवेगळ्या कारणांसाठी आहेत.
वरील नक्षत्रांविषयीची माहिती इथे द्यावयाची झाल्यास हे लिखाण फार वाढत जाईल. आपण एवढेच समजून घेऊया कि राहू केतू यांना न घाबरता त्यांचे शुभ अशुभ परिणाम समजून घेऊया.
- राहूचा राशी स्वामी, नक्षत्र स्वामी, राहूचा उप नक्षत्र स्वामी , उपउप नक्षत्र स्वामी यांचा संबंध जेव्हा जेव्हा ज्या ज्या नक्षत्र स्वामी, उपनक्षत्रस्वामी व उप उपनक्षत्रस्वामी बरोबर येतो त्यावेळी त्याच्या कारकत्वाच्या घटना आपल्या आयुष्यात घडतात. हे बारकाईने जाणून घेतल्यास आपल्याला कांही गोष्टींची, घटनांची तीव्रता कमी करता येईल.
- मी माझ्या आजवरच्या या ५३,५४ वर्षाच्या कारकिर्दीत अशा अनेक कुंडल्या पाहिल्या कि ज्यांच्या कुंडलीत राहूचे नक्षत्रीय शुभसंबंध आहेत, शुभ महादशांचा कालावधी आहे त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला व अजूनही घेत आहेत.
- तसेच ज्यांच्या कुंडलीत राहूचे नक्षत्रीय अशुभ संबंध आहेत व महादशांपण त्रासदायक आहेत त्याच्या जीवनात दुःख आले पण त्यावरील शुभ उपायांनी,तसेच स्वभावात, सवयीत बदल करून त्यांची तीव्रता कमी करता आली आहे.
- आजवर तरूणांच्या शिक्षणात भविष्यात येणारे अडथळे, नोकरी व्यवसायात भविष्यात येणार्या अडचणी व वैवाहिक जीवनातील दुःख, यांची कृष्णमूर्ती पद्धतीच्या अभ्यासाने विवीध उपायांनी तीव्रता कमी झाली आहे.
- याचे श्रेय मात्र कृष्णमूर्ती पद्धतीलाच जाते.
लेखन संदर्भ :- १) कुंडलीची भाषा कै. डाँ. यशवंत सखाराम शुक्लज्योतिर्वीद्या संशोधन मंडळ, नासिक
२)ज्योतिष शलाका डाँ. लता गज्जर. चंद्रवल्लभ प्रकाशन.
very very useful info
Khup chhan ani mahiridayak lekh. Abhar
Very useful
अतिशय चांगली माहिती.
अत्यंत सोपी लेखनशैली. सहज भाषे मुळे राहु केतू समजण्यास अधिक फायदा झाला . धन्यवाद गुरुमाउली.
राहु केतु चे परीक्षण अतिशय चांगल्या रितीने समजावून लिहीलेले आहे
धन्यवाद