श्लोक पहिला.
हरिः ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि| त्वमेव केवलं कर्ताSसि| त्वमेव केवलं धर्ताSसि| त्वमेव केवलं हर्ताSसि| त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्माSसि| त्वं साक्षात आत्माSसि नित्यम् ¦1|
ऋतं वच्मि| सत्यं वच्मि |२|
अव त्वं माम्|अव वक्तारम् |अव श्रोतारम् |अव दातारम् |अव धातारम् |अवानूचानमव शिष्यम् |अव पश्र्चातात| अव पुरस्तात् | अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् | अव चोध्वा्रत्तात् | अवाधरात्तात् | सर्वतो मां पाहि पाहि समंतात ||३||
पहिल्या श्लोकाची सुरूवातच ॐकारस्वरूप श्री हरीच्या नामोच्चाराने केली आहे. कोणताही वेदमंत्र ॐकारपूर्वक म्हणावा. प्रथम ॐकार उच्चारला नसेल तर त्या वेदमंतत्राला मंत्रत्व येत नाही ,मंत्रत्वाची शक्ती निर्माण होत नाही यामुळे तो मंत्रही निष्फळ होतो. श्री गणेशाला “ त्वं प्रत्यक्षं ” असे संबोधून त्याला साक्षात दृश्यरूपात व्यक्त केले आहे. मूर्त म्हटले आहे. श्री गणेशाचे रूप कसे आहे तर सिद्धिबुद्धियुक्त आहे. हे गण+ पते , देवादिगणांचा अधिपती असलेल्या हे देवा गणेशा तुला नमस्कार असो. हे गजानन आपण प्रत्यक्ष, थेट परब्रह्म आहात, ब्रह्मणस्पती आहात.
तूच एक केवळ मात्र सर्व जगताचा, विश्र्वाचा कर्ता आहेस. या कर्तेपणात असा भाव आहे की आम्ही जे काही कार्य करतो ते करणारा, करवून घेणारा हे सर्व काही तूच आहेस. हे म्हणण्यामागे ही भावना आहे की मिळणार्या यशाने माझा अहंकार वाढणार नाही व अपयश आले तरी निराशेने मी खचूनही जाणार नाही, कारण ह्या सर्व कारणामागचा अधिष्ठाता तूच आहेस. मी नाहीच. तसेच आमचे पालन पोषण करणारा पण तूच आहेस. तुझ्यामुळेच ही जीवसृष्टी चैतन्यमय आहे. शेवटी या सर्वांचा संहारकर्ताही तूच आहेस. एवढेच नाही तर “इदं ” या शब्दाने व्यक्त होणारे हे विश्र्व, व साक्षात ब्रह्मही तूच आहेस. सर्व वस्तूंच्या ठिकाणी चिद्रूपाने भासणारा साक्षात जगदात्माही तूच आहेस.
हे सर्व मी वाणीने अगदी मनापासून सांगत आहे जे तूझ्या इतकेच सत्य आहे.
तूं माझे रक्षण कर. तुझे गुण गायन करणार्यांचे, तुझ्या गुणांचे श्रवण करणार्यांचे सुद्धा तू रक्षण कर. ज्या श्रीगुरूनी मला या सन्मार्गावर आणले त्यांचेही तू रक्षण कर. माझे आध्यात्मिक पोषण करणार्या व मला उपासना देऊन माझ्या चित्तात विराजमान होणार्या गुरूंचेही रक्षण कर. माझ्या जवळपास राहून उपासना करणार्या शिष्यांचेही रक्षण कर. एवढेच काय तर..
पश्र्चिम दिशेकडून माझे रक्षण कर, पूर्व दिशेकडून माझे रक्षण कर, उत्तर दिशेकडून माझे रक्षण कर, दक्षिण दिशेकडूनही माझे रक्षण कर., ऊर्ध्व दिशेकडून, भूमीच्या( अधर.) दिशेकडून, माझे रक्षण कर,. ( सर्व तो मां पाहि पाहि समंतात्) एवढेच नाही तर माझे सर्व बाजूनी रक्षण कर, हे देवा गणाधिशा माझे रक्षण कर.
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः| तमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः | त्वं. सच्चिदानंद द्वितीयो S सि| त्वं प्रत्यक्षं ब्रह्माSसि | त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोSसि ¦¦4¦¦ सर्व जगदिदं त्वत्तो जायते| सर्व जगदिदं त्त्वत्तस्तिष्ठति |सर्व जगदिदं त्वयि लयमेष्यति | सर्व जगदिदं त्वयि प्रत्येति | त्वं भूमिरापो S नलो S निलो. नभः | त्वं चत्वारि वाक्पदानि ¦5¦ त्वं गुणत्रयातितः |त्वं देहत्रयातीतः| त्वं
कालत्रयातीतः | त्वं मूलाधारस्थितोS सि नित्यम् | त्वं शक्तित्रयात्मकः | त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यम् | त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वमिंद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्तं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूभुर्वः स्वरोम् ¦¦6¦¦
वाक् – चित – आनंद ही श्रीगणेशाची स्वरूपात आहे. गुण आणि स्वरूपलक्षण यात मोठा फरक आहे. कालांतराने गुणामधे बदल होत असतो. पण स्वरूपामधे मात्र कधीच बदल होत नाही. म्हणूनच हे सर्व त्याचे स्वरूपलक्षण आहे. वेद, वाङ्मय हे ही तूच आहेस. सर्व वस्तू प्राणीमात्रांमधे असलेले चैतन्यही तूच आहेस. तू आनंदमय ब्रह्म आहेस. सत् चित् आनंदरूप आणि अद्वितीय असा तूच एक आहेस. ज्ञान व तेही तूच आहेस. तू फक्त वाङमयच नाहीस तर चिन्मय ही आहेस. तू स्वतः तेजोमय ज्ञानरूप आहेस. सगुण स्वरूप तर आहेसच त्याचबरोबर सगुण ब्रह्मही तूच आहेस. ज्ञान व विज्ञान ही दोन्ही तुझीच रूपे आहेत. ¦¦4¦¦ हे सर्व विश्र्व तुझ्यापासूनच निर्माण झाले आहे. हे विश्व तुझ्याच आधारशक्तीने स्थिर राहिलेले आहे. याचा लयही तूझ्याच ठिकाणी होतो. पुनः हे जग तुझ्यापासूनच उत्पन्न होते व पुनः लयाला जाते. निर्मिती, पालन व त्यानंतरची तिसरी अवस्था आहे लयाची. ही लयाची अवस्था म्हणजे विनाश नाहीतर लय म्हणजे अंतिम बिंदु. लय म्हणजे परिपूर्णता.. लय म्हणजे दैवी भाव.जसे वृक्षाचा प्रवास म्हणजे बीजापासून प्रारंभ व पुनः बीजतत्वातच परिपूर्ण होतो याच स्थितीला लय म्हटले आहे. म्हणूनच त्वं भूमिरापो नलो निलो नभः| भूमी, आकाश वायु, तेज व जल ही पंचतत्त्वे ही तूच आहेस. तसेच वाणीचे चतुर्विध स्थानही तूच आहेस ज्यांना परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी असे संबोधले जाते. ¦¦5¦¦
हे श्रीगणेशा एवढा सगळा तर तू आहेसच त्याच बरोबर सत्व, रज, तम या गुणांच्या पलीकडे तू आहेस. म्हणजेच जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलीकडे तू आहेस. स्थूलदेह, लिंगदेह व कारणदेह या देहत्रयीच्याही पलीकडे तूचआहेस. भू त, वर्तमान व भविष्यकाल या तीनही कालांपलीकडे तू आहेस. सृष्टी चा मूल आधारही तूच आहेस. निर्माण कृती, पालन शक्ती व संहार कृती या तीन शक्तिरूपात तूच आहेस. तूच ब्रह्मा, तूच विष्णु, तूच रूद्र, तूच इंद्र, आहेस. अग्नि, वायु, सूर्य, चंद्र, भू लोक स्वर्गलोक हे सर्वही तूच आहेस. ॐकार हे रूपही तूझेच असल्याने सर्व योगी सतत तूझेच ध्यान करत असतात. ¦¦6¦¦