अथर्वशीर्ष विवेचन भाग १.

||  श्री गणेशाय नमः ||

श्री गणपती अथर्वशीर्ष  हे श्री गजाननाचे अत्यंत प्रभावी व फलदायी असे स्तोत्र आहे. मनापासून केलेल्या कोणत्याही कामाचे फळ मिळतच असते पण या स्तोत्राच्या पठणाने मानवाच्या  ईच्छा पूर्ण होतात. श्री  गजाननाच्या उपासनेत ज्यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले अशा बर्‍याच व्यक्तींचा मला सहवास लाभला. त्यांच्याबरोबर झालेली चर्चा म्हणजे माझ्यासाठी एक नवीन दृष्टी देणारे रसायनच ठरले. त्यातूनच या अभ्यासास सुरूवात झाली व श्री गजाननाच्या कृपेने आयुष्याला वेगळे वळण मिळाले. यात माझे पहिले गुरू माझे वडील आण्णा व माझे मामा  शशिकांत गद्रे यांनीही मोलाची दृष्टी दिली. त्यांना नमस्कार करून आपण या विषयाला सुरूवात करूया.

प्रथम श्री अथर्वशीर्षाची  विशेषतः लक्षात घेऊया.

यामध्ये प्रत्येक अगोदरच्या ऋचेचा पुढील ऋचेशी सहसंबंध आहे.

प्रत्येक पहिल्या मंत्राचा अगोदरच्या मंत्राबरोबरही असाच सहसंबंध आहे.

ऋचा व मंत्र याचबरोबर प्रत्येक अगोदरच्या शब्दाचा तसेच त्या शब्दाच्या अर्थाचा पण तसाच सहसंबंध आहे.

ह्या ऋचा, मंत्र, शब्द व त्यांचे अर्थ यातील  अंतर्संगतीचा विचार केल्यास  नवनवीव अर्थाचे झरे समोर येऊ लागतात.

“ अथर्व ”  यात संस्कृतचा धातू आहे थर्व. थर्व या धातुचा अर्थ असा आहे की गती, किंवा पुढे जाणे. पुढे जाणे कशासाठी तर आपल्याला जे मिळवायचे आहे त्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न म्हणजेच वारंवार करण्यात येणारे प्रयत्न. विद्यार्थी जसा परीक्षेची तयारी करताना एखादा प्रश्न येत नसल्यास त्याची घोकंपट्टी करतो व शेवटी त्याच प्रश्नाच्या बळावर गुण मिळवून अपेक्षित यश संपादन करतो. तसेच मानवाला आपल्या आयुष्याच्या परिक्षेत पास होण्यासाठी अंतिम ध्येय गाठण्यासाठी अशीच तयारी करावी लागते.

थर्व या धातुचा नकार वाचक ‘अ’ हा उपसर्ग लावल्याने त्याचा अर्थ बदलला आहे. थर्व म्हणजे पुढे जाणे तर अथर्व म्हणजे गती रहित होणे. आता ही गती रहितता कशी बरे तर अंतिम साध्य प्राप्त झाल्यानंतरची स्थिरता आहे., आनंद आहे. जे मिळवावयाचे होते ते मिळाले जीवन कसे कृतकृत्य झाले. हाच भाव या अथर्व मधे आहे. अथर्वतेचा अर्थ म्हणजे मनाला, शरीराला  मिळणारी शांती, समाधान व कृतकृत्यता होय. पण हे सर्व मिळण्याचे ठिकाण  एकच आहे आणि ते म्हणजे श्री गजाननाच्या चरणी लीन होणे, एकरूप होणे, तादात्म्य पावणे होय.

याता आपण यातील  अर्थाकडे वळुया.

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः |

ही अथर्वता मिळवण्यासाठी आम्हाला कांही अटी पाळायला पाहिजेत. त्यातील पहिली अट म्हणजे “अभद्र श्रवण निषिद्ध” आहे. जर आम्ही अभद्र, अप्रिय, विकृत, शिव्यागाळी ऐकत असू तर काय होईल? निसर्गाचा नियम काय आहे जे पेरतो तेच उगवते. जे कानावाटे आत जाते तेच मुखावाटे बाहेर येईल.जसे लहान मूल आपण जसे हेल काढून बोलू तेच हेल काढून दाखवते, बोलते. तसेच  आम्ही जर अभद्रच ऐकत असू तर मुखातून तेच येणार मग जी शांती वा समाधान आपल्याला अपेक्षित आहे ते कसे मिळणार. आम्ही अभद्र मुध्दाम ऐकत नाही पण कुठेही गेले तरी जाता जाता नकळत कानावर पडते मग अशा वेळी काय करावे तर  प्रथम दुर्लक्ष करावे ते शक्य न झाल्यास त्या ठिकाणापासून दूर जावे. म्हणूनच पहिला नियम  ‘ॐभद्रं कर्णेभिः शृणुयाम ’

यानंतर  “भद्रं पश्ये ”चांगले, जे हितकर आहे, जे मनाला शांतता देणारे आहे तेच पाहू. आपल्याला वाईट पहायला कधीच आवडत नाही पण काहीवेळा या वाईट गोष्टीही मनाला सुखावतात असा अनुभव येतो. एखादी घाण वास येणारी गोष्ट रस्त्यावर पडली असेल तर आपण रस्ता बदलून जातो पण वाईट साईट संभाषण किंवा घाण शिवीगाळ कानावर पडल्यावर आपले कुतूहल चाळवते व आपण जरातरी कान देऊन ऐकायचा प्रयत्न करतो म्हणूनच श्री अथर्णव ऋषीनी पाहणे व ऐकणे ही दोन प्रतिके वापरली आहेत. याचा गर्भितार्थ असा आहे की. आमच्या पंचेंद्रियांनी, सर्व  काही मंगलच करावे. म्हणजे अभद्र  असे पाहणे, ऐकणे, बोलणे, वास घेणे व स्पर्शही नको.

“  स्थिरैरंगैस्तुष्टुवाम्  सस्तनुभिः  ”

वरीलप्रमाणे आमच्या पंचेद्रियांना आम्ही योग्य वळण लावले तरी या सर्व विचारांना जोड लागेल ती शरीराची. आपले शरीर सुदृढ, निरोगी म्हणून श्री अथर्णव ऋषीनी एक महत्वाचा उपाय सांगितला आहे. तो म्हणजे आम्ही आमचे जीवन, देवता कार्यासाठी व्यतीत करू.  आता देवता कार्य म्हणजे असे कीं आम्हाला आमचे कर्तव्य करायला आंतरिक बळ मिळो ज्यायोगे हे कर्तव्य पालन म्हणजेच हे श्री गजानन तुमचेच पूजन होय. आमच्या क्षमतेनुसार, ज्ञानानुसार आपल्या समोर आलेले कार्य करणे हेच देवता कार्य आहे. जीवनभर आम्ही शास्त्राला धरूनच राहू, आम्हाला आमच्या कर्तव्याबरोबर  स्थिर करा. तरच मनःशांती लाभेल.

आता इथून पुढे दुसर्‍या श्लोकात केलेल्या प्रार्थना पाहुया.

ॐ स्वस्ति नःइंद्रो वृद्धश्रवाः. | स्वस्त नः पूषा विश्रववेदाः |

स्वस्ति नः ताक्ष्याो्र  अरिष्टनेमिः |स्वस्ति नो बृहस्पतिसर्दधातु  ||

ॐ शांतिः  शांतिः . शांतिः||

श्री इंद्रदेव आमचे कल्याण करो. इंद्र म्हणजे सर्व  ज्ञानाचा , सामर्थ्याचा, सर्व सत्तांचा अधिकारी  तसेच जे जे पृथ्वीतलावर मंगलमय आहे  त्यांचा कर्ता करविता हे इंद्रदेव तो आमचे कल्याण करो. पहिल्या श्लोकात पंचेद्रियांचे  वळण  नंतर शरीर समृद्धी व आता यांच्या संयोगाने येणारी ज्ञानसत्ता होय. बुद्धी बरोबर येणारी स्मृती म्हणजे योग्य वेळी योग्य आठवण्याची विनंती स्मरणरूपी सत्तेला करत आहे. म्हणजे नुसते  आचार विचार चांगले असून चालणार नाही तर त्याचबरोबर स्मरणालाही तितकेच महत्व आहे.

दुसरी प्रार्थना ‘ विश्र्ववेदाः ’  येथे वेद या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे.

वेद म्हणजे  सर्व काही समजणे व ते इतरांना  समजावून सांगणे, दाखवणे.ज्या बुद्धीने  या विश्र्वाचे ज्ञान होते ते विश्र्व वेद म्हणजे ज्ञानाचा श्री सूर्यच आहे. तरी या श्री सूर्याच्या ज्ञानप्रकाशान आमचे जीवन  शुद्ध होऊन उजळून निघू दे.

तिसरी प्रार्थना श्री गरूडांना आहे. ताक्षर्य म्हणजे गरूड. आधी ज्ञानप्रकाशान आमचे जीवन उजळून निघाले व विश्र्वदर्शन झाले. विश्र्वाच्या गतीची जाणीव झाल्यावर अथर्वतेकरीता घेतलेली झेप म्हणजेच गरूड होय. ते गरूडही कसे आहे तर त्याच्या एका झेपेने जे जे अनिष्ट, अहितकारक आहे त्याचा नाश करणारे आहे. संकटाचा नाश करणारे आहेत. आता हे संकट कोणते तर आमच्या जीवनातील थर्वता हेच संकट आहे.

चौथी प्रार्थना आहे हे श्री गुरूवर्य तुमची आमच्यावर कृपा होऊ दे. श्री गुरूंना बृहस्पती म्हणून संबोधित केले आहे. आमच्यात अथर्वता येण्याकरता  श्री गुरूकृपेची आवश्यकता आहे. आणि श्री गुरूकृपेच्या लाभाने आमची आध्यात्मिक, आधिभौतिक  व आधिदैविक अशा तीनही तापाची शांती होते. म्हणून   ॐ शांतिः. शांतिः. शांतिः||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *