३ ऑगस्टला श्रावण पौर्णिमा आहे. योगायोगाने श्रावणातील सोमवारही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील भाऊबहिणींच्या प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधनही सण आहे. फक्त भाऊ-बहीणच नाही तर संपूर्ण समाजानेच एकमेकास स्नेहबंधन बांधण्याचा सण होय. इथे जातपात, धर्म, श्रीमंत गरीब हा भेदभाव गळून पाडणारा हा सोहळा आहे. म्हणूनच रक्ताच्या नात्याचे असो वा नसो मानलेले बहिण-भाऊ सुद्धा एका नाजूक धाग्याने बांधले जातात. वास्तविक असे सण वैश्विक सण म्हणून साजरे करायला पाहिजेत.
फक्त मनुष्य प्राण्यालाच ही नातीगोती आहेत. पशुपक्षी , जनावरे यांना मादीने जन्म दिल्यानंतर ती जगण्यास सक्षम झाल्यावर त्याच्यातील हे नाते संपुष्टात येते. म्हणूनच एखादे भक्ष्य मिळवण्यासाठी त्यांच्यात मारामारी होते. व त्यात ज्याची ताकद जास्त तो ते भक्ष्य मिळवतो. मानव प्राणी बुद्धिमान असल्याने त्याच्यातील परस्पर प्रेमाची, वात्सल्याची वीण घट्ट होत जाते. व परस्पर नातेसंबंध सुदृढ होते. पण….
पण जेथे बुद्धीवर विकारांनी मात केलेली असते तेव्हा मनुष्याची सारासार बुद्धी नष्ट होते व मग पाशवी वृत्ती जागृत होते. म्हणूनच हे सण साजरे करण्याची आज गरज निर्माण झालीय. रक्षाबंधनाचा कार्यक्रम हल्ली शाळांमधे व सामाजिक पातळीवरही होतोच पण अजूनही त्यातून आपल्याला जे साधायच आहे ते साधता आलेले नाही. म्हणूनच निर्भयासारख्या प्रकरणाचे दुःख आपल्याला सहन करावे लागते व आयुष्यभर भोगावे लागते.
भारतीय संस्कृतीत स्त्रीचे पूजन केले आहे.
” यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:“
थोडक्यात काय जेथे स्त्रीचे पूजन केले जाते म्हणजे तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो तेथे देवही रमतात, म्हणजेच शुद्ध विचार निर्माण होतात.
असे हे रक्षाबंधन म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. बहिणीला खंदा रक्षणकर्ता मिळतो व तिचेही जगण्याचे बळ वाढते. आज ज्या भारतासारख्या पुण्यक्षेत्री अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम्, अशी ब्रह्मवाक्य तयार झाली.
तसेच परमपूज्य जिजाऊ, झाशीची राणी, राणी आक्कम्मा, सावित्रीबाई फुलेसारख्या स्त्रियांनी आपल्या भारतमातेला धन्य केले. .
या श्रावण पौर्णिमेचे दुसरे महत्त्व असे आहे की, याच श्रावण पौर्णिमेला समुद्राचे पूजन केले जाते. जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे मच्छिमारांनी आपले काम थांबवलेले असते. ते पुन्हा सुरू करण्याचा, सागरपूजा करून सागरात जाळे टाकण्याचा सण. हा सण म्हणजे एक उत्सवच असतो. साहसी व्यापाऱ्यांचा सण. पूर्वी याच सामुद्रीमार्गे विविध देशाचे व्यापारी मालाची ने-आण करत असत. आता मालगाड्या, विमाने आली तरीही हा व्यापार सुरू आहेच. या समुद्रावर तक्ता चालवणार्या वरूणदेवाने आपल्यावर कृपा करावी, सागरानेही कृपा करावी म्हणूनच सागराला नारळ अर्पून त्याची पूजा करून मगच व्यापाराला सुरूवात केली जाते. अशी ही श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा.
आता तिसरे महत्त्वाचे असे की ब्राह्मण समाजात याच दिवशी जानवे बदलतात. जानवे म्हणजे यज्ञोपवीत. यज्ञोपवीत घालणे म्हणजे जीवनात अनेक गोष्टींवर, वृत्तीवर नियंत्रण आणणे. देवदेवतांपासून प्रेरणा, नवीन हिम्मत, व समाधान घेऊन जीवन तेजस्वी बनविणे. स्वकर्तृत्वाने भान ठेवून जीवनातील ध्येय ठरवणे. व हे यज्ञोपवीत बदलण्याचे काम दरवर्षी केले जाते. यासाठी हा दिवस महत्वाचा आहे.
सारांश काय तर श्रावण महिन्याची ही पौर्णिमा आपल्या जीवनाचे सोने करणारी आहे.
पुढील आयुष्यातील इच्छा, आकांक्षा, ध्येयांची निश्चिती करून त्या मार्गाने जाण्याचा शुभारंभ करण्याचा दिवस. त्रिवेणी संगमाचा दिवस.
- रक्षाबंधनाचा कालावधी सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.२५ ते रात्री ९.२८ पर्यंत आहे.
- ज्यांची रास मकर व नक्षत्र श्रवण असेल त्यांनी आपली आगामी वर्षांतील ध्येय, उद्दिष्ट्ये यांची आखणी करावी. कर्क व मकर राशीच्या व्यावसायिक भागीदारांचे संंबंध सुधारतील.
- बिघडलेले नातेसंबंध नव्याने सुरळीत करण्यासाठी ३ ऑगस्टला, रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संध्याकाळी ६.०३ ते ७.५३ या वेळेत मोकळेपणाने बोलल्यास ते वृद्धिंगत होतील.
- शिवउपासकांनी शिवलीला अमृताचा ११ वा अध्याय, शिव कवच, शिवस्तुती, श्री रुद्रवाचन, ओम नमः शिवाय हे नामस्मरण करावे.